गेल्या महिनाभरापासून विजेचे दिवस व रात्रीला अनेकवेळा जाणे-येणे सुरू आहे. दिवसातून बऱ्याचदा वीज खंडित होत आहे. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने व लॉकडाऊन असल्याने बहुतांश नागरिक घरीच राहणे पसंत करीत आहेत. अशातच अधूनमधून विद्युत पुरवठा खंडित होत असून सध्या उकाडा जास्त असल्याने नागरिक उकाड्याने त्रासून गेले आहेत. तसेच दुकानदार व इतर व्यावसायिक या विजेच्या लपंडावाने हैराण झाले आहेत.
१५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह झालेल्या वादळी पावसामुळे चामोर्शी शहराच्या काही वाॅर्डातील विद्युत पुरवठा रात्रभर पूर्णपणे बंद होता. त्यामुळे रात्रभर डासांचा त्रास सहन करावा लागला. तसेच गावांमधील विद्युत पुरवठासुद्धा खंडित झाला होता. चामोर्शी शहरात १५ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे जवळपास पाच ते सहा तास विद्युत पुरवठा खंडित झाला. पाऊस येऊन निघून गेल्याने उकाड्याच्या वातावरणात डासांच्या त्रासाने नागरिक विद्युत पुरवठा सुरू होईपर्यंत झोपू शकले नाहीत. त्यामुळे शहरात व ग्रामीण भागात होत असलेला विजेचा लपंडाव बंद करण्यात यावा व तांत्रिक अडचणी दुरुस्त करून नियमित वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.