देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील पहिली नगरपरिषद असलेल्या देसाईगंज शहराच्या सिटी सर्व्हेचे काम गेल्या साडेतीन वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. १८ महिन्यांत, म्हणजे दीड वर्षात हे काम पूर्ण करण्याची हमी भूमिअभिलेख कार्यालयाने दिली होती. पण साडेतीन वर्षे झाली तरी हे काम कुठे अडले? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
शहरातील सिटी सर्व्हेबाबत नागरिकांची बहुप्रतीक्षित मागणी पाहता, तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याहस्ते दि ९ एप्रिल २०१८ ला या कामाची सुरुवात झाली होती. जिल्ह्यातील सर्वात पहिली नगर फपरिषद, सर्वात मोठी बाजारपेठ आणि जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज शहराच्या सिटी सर्व्हेबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी एएसआर नायक यांनी पुढाकार घेऊन ३० मे २०१६ ला जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय गडचिरोली यांना पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर देसाईगंज सिटी सर्व्हेच्या कारवाईला वेग आला. त्या पत्राचा संदर्भ देऊन नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी २२ सप्टेंबर २०१७ ला भूमिअभिलेख कार्यालयास देसाईगंज शहराच्या सिटी सर्व्हेबाबत पत्रव्यवहार केला होता.
याबाबत उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय देसाईगंज यांच्या २६ जुलै २०१७ च्या पत्रान्वये देसाईगंज नगरपरिषद हद्दीतील मौजा विर्शितुकूम, वडसा व नैनपूर येथील नवीन गावठाण (सिटी सर्व्हे) मोजणीसाठी ३ कोटी ४६ लाख ५८ हजार ६२५ रुपये एवढा खर्च दर्शविण्यात आला होता. याबाबत जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे १ कोटी ७५ लाख रुपये पहिल्या हप्त्याचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.
नगरभूमापन सिटी सर्व्हेचे काम हाती घेण्यासाठीची कार्यवाही जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाने तातडीने केली होती. त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के रक्कम भरणा करावी आणि उर्वरित २५ - २५ टक्के याप्रमाणे पुढील दोन वित्तीय वर्षात भरणा करण्याचे ठरले. त्यासाठी न.प.च्या ठरावासह, हमीपत्र भूमिअभिलेख कार्यालय गडचिरोली यांना प्रस्ताव सादर करण्याचे ठरले. मात्र पहिली रक्कम भरूनही हे काम प्रगती करू शकले नाही.
कोट-
माझ्याकडे आताच जिल्हा अधीक्षक पदाचा प्रभार आलेला आहे. संबंधीतांना कारणे दाखवा नोटीस बजावणे सुरू केले आहे, वर्ग २ च्या अधिकाऱ्यांकडून मिळकती तपासणी अत्यावश्यक आहे. सध्या जिल्ह्यात अधिकाऱ्यांची कमतरता आहे, तरीही याची वरिष्ठांकडून मागणी करून देसाईगंज सिटी सर्व्हेचे काम तातडीने पूर्ण केले जाईल
- नंदा आंबेकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख गडचिरोली
(बॉक्स)
आतापर्यंत अदा केले २ कोटी ७६ लाख रुपये
सिटी सर्व्हेकरिता देसाईगंज नगरपालिकेने भूमिअभिलेख कार्यालयाला तब्बल २ कोटी ७६ लाख रुपये अदा केले आहेत. तरीसुद्धा हे काम कुठे अडले आणि कुठे पाणी मुरत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाने १८ महिन्यांत हे सिटी सर्व्हेचे काम पूर्ण करण्याची हमी दिली होती, ती हवेतच विरली. विशेष म्हणजे या कामामुळे साडेतीन वर्षांपासून शहरातील नागरिकांना मिळकतीची सनद व नकाशा मिळतच नसल्याने अनेकांपुढे अडचण निर्माण झाली आहे. भूमिअभिलेख कार्यालयाच्या या मनमानी व भोंगळ कारभाराविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.