गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच अच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
सिरोंचा तालुक्यातील बस थांब्यांची दुर्दशा
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाले आहेत. भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या असून, घाणीचे साम्राज्य आहे.
अहेरी शहरातील अतिक्रमण कायमच
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली; मात्र दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन केव्हा हाेणार
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील वन्यपशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील हगणदारीमुक्तीवर प्रश्नचिन्ह
विसोरा : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी शौचालये निकामी झाली आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक लाेटा घेऊन रस्त्याकडेला जातात.
अल्पवयीन चालकांवर कारवाई नाही
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली, तरी अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहन शेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे स्मशानभूमीचा विकास करावा, अशी मागणी हाेत आहे.
अतिक्रमण वाढले
गडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंचाई विभागाच्या तलावात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणाचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. यावर्षी तलावात पाणी कमी असल्याने आणखी जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गावकऱ्यांचे हाल
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. वेंगनूर येथे शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. तळोधी मो., भेंडाळा, कान्होली, कमळगाव या भागात पक्के रस्ते तयार केले नाहीत.
मालेवाडा समस्याग्रस्त
कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्यसेवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचाा दर्जा द्यावा.
बसथांब्याची दुरवस्था
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
धूम्रपानाने आजारात झाली वाढ
आष्टी : आहाराच्या बदलत्या सवयी, अंमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, धूम्रपान यामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. अनेक जणांना आजाराची लागण होत आहे. त्यामुळे रुग्णालयात गर्दी वाढत आहे.
वृक्षतोडीवर प्रतिबंध घालण्याची मागणी
सिरोंचा : वनविभाग व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने नागरिकांमध्ये वृक्षतोड न करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. परंतु जिल्ह्यातील वनांचे प्रमाण वृक्षतोडीमुळे कमी झाले आहे.
नळाला तोट्या नसल्याने पाण्याचा अपव्यय
गडचिरोली : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत.
शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करा
अहेरी : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत.
खुल्या जागेत कचऱ्याचे साम्राज्य
गडचिरोली : गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात अनेक वाॅर्डांमध्ये ओपन स्पेस आहेत. मात्र काही मोजक्याच ओपन स्पेसला संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या ओपन स्पेसला संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न. प. प्रशासनाने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करावा.
अनुदानात वाढ करण्याची मागणी
कुरखेडा : निराधारांना शासनाकडून प्रतिमाह अत्यल्प अनुदान दिले जाते. हे अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.
रस्त्याच्या बाजूला वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. या वाहनांवर कारवाई होत नसल्याने. वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
ग्रामीण भागात पेट्रोेलची अवैध विक्री
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लिटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.
अतिक्रमणाच्या विळख्यात आरमाेरी
आरमोरी : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर तसेच खुल्या जागांवर नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे रस्ते अरूंद झाले असून, अपघातांची संख्या वाढली आहे. मात्र अतिक्रमण काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
चामोर्शी तालुक्यातही गावांना रस्त्याची प्रतीक्षा
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील वेंगनूर येथे अद्यापही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. प्रशासनाने याची दखल घ्यावी. पांदण रस्त्याचेही खडीकरण न झाल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात त्रास हाेताे.
खरपुंडी मार्गाचे रूंदीकरण करण्याची मागणी
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रूंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रूंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी, याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून जेप्रा, दिभना, अमिर्झा, चांभार्डा, आंबेशिवणी, भिकारमौशी, राजगाटा, उसेगाव आदी गावांतील शेकडो नागरिक ये-जा करतात. मार्ग अरूंद असल्याने वाहतुकीस अडथळा होतो.
जिल्ह्यात गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा
एटापल्ली : अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आदी दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये फारच कमी प्रमाणात आहेत. जिल्ह्यात १०० टक्के शौचालय असणारे एकही गाव नाही. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारात वाढ होत आहे. ग्रामीण भागातील नागरिक रस्त्याच्या मुख्य मार्गावरच उघड्यावर शौचास बसत आहेत.