संजय तिपाले, गडचिरोली: छत्तीसगड सीमेवरील कांकेरच्या जंगलात पोलिस व माओवाद्यांत २७ मार्च रोजी रात्री जोरदार चकमक उडाली. पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर माओवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात नक्षलीसाहित्य जप्त केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या माओवाद्यांचे पोलिसांनी दुसऱ्यांदा मनसुबे उधळून लावले आहेत.
छत्तीसगडच्या औंधीसह एटापल्ली तालुक्यातील कसनसूर, धानोरा तालुक्यातील चातगाव दलमचे माओवादी महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील कांकेरच्या जंगलात तळ ठोकून आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचा माओवाद्यांचा कट होता. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यावरुन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या भागात अपर अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली नक्षलविरोधी अभियान गतिमान केले. राज्य राखीव दलाच्या ८ तुकड्या, सी-६० चे जवान व एक शीघ्रकृती दलामार्फत परसिरात सर्च ऑपरेशन राबविले. यावेळी माओवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले.
पोलिसांचा वाढता दबाव पाहून अखेर माओवाद्यांना माघार घ्यावी लागली. अंधाराचा फायदा घेत ते तेथून पळाले. घटनास्थळाहून वायर्स, जिलेटिनच्या काठ्या, बॅटऱ्या, सोलर पॅनल इत्यादी जप्त केले. या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले आहे.
तीनवेळा पोलिस व माओवाद्यांत धूमश्चक्री
२७ मार्चच्या रात्री तीनवेळा पोलिस व माओवाद्यांत धूमश्चक्री झाल्या. सुरुवातीला सायंकाळी ६ वाजता, त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता व २८ रोजी पहाटे साडेचार वाजता चकमक उडाली. पोलिसांनी जशास तसे उत्तर दिल्याने माओवाद्यांनी नांगी टाकली. त्यांचा घातपाताचा डाव उधळून लावण्यात पोलिस यशस्वी झाले.
आठ दिवसांतील दुसरी घटना
लोकसभा निवडणुकीत पोलिस दलाला नुकसान पोहोचविण्यासाठी माओवाद्यांच्या कुरापती सुरु आहेत. यापूर्वी १९ मार्चला पहाटे कोलामार्का जंगलाम माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळ्या झाडल्या, यात चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर कांकेर जंगलातही चकमक उडाली.