लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : तालुक्यातील जांभूळखेडा सिंचन तलावाच्या कालव्यात गाळ व कचरा साचल्यामुळे पाण्याचा निकासी मार्गावर अवरोध निर्माण होत होते. सदर बाब येथील मुनघाटे महाविद्यालयाच्या रासेयो पथकाच्या निदर्शनास येताच विद्यार्थ्यांनी मंगळवारला श्रमदानातून कालव्याची स्वच्छता व डागडुजी केली. त्यामुळे तलावाचे पाणी आता शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यास सोयीस्कर होणार आहे.गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत कुरखेडा येथील गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयाचा जलशक्ती व मतदान जनजागृतीसाठी युवाशक्ती या विषयावर विशेष शिबिर दत्तक ग्राम जांभूळखेडा येथे आयोजित करण्यात आले. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेतून श्रमसंस्कृती रुजविण्याच्या अनुषगांने मंगळवारला रासेयो पथकातील १०८ स्वंयसेवकानी क्षतीग्रस्त झालेल्या सिंचन तलावाचा कालवा दुरुस्तीचा उपक्रम हाती घेतला. या सिंचन तलावाअंतर्गत जांभूळखेडा, येरंडी व गोठणगाव येथील शेतजमीन येते. सदर उपक्रम रासेयो पथकाने प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. गुणवंत वडपल्लीवार, प्रा. डॉ. रवींद्र विखार, डॉ. संदीप निवडंगे, डॉ. राखी शंभरकर, जांभूळखेडाचे सरपंच राजबत्ती नैताम, उपसरपंच गणपत बंसोड, पोलीस पाटील नंदेश्वर, प्रल्हाद धोंडणे, वासुदेव दाजगाये, धनराज गहाणे यांच्या मार्गदर्शनात राबविला.
आता पाणी थेट शेतापर्यंत पोहोचणार- जवळपास एक किलोमीटर असलेल्या कालव्यातील साचलेला गाळ स्वच्छ करत विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी खचलेल्या कालव्याची पाळ दुरुस्त केली. कालव्यात पडलेले माती, गोटे बाहेर काढत पाण्याच्या निचऱ्यासाठी अडलेला मार्ग मोकळा केला. सदर कालव्याची स्वच्छता व दुरुस्ती झाल्याने तलावाचे पाणी थेट शेतापर्यंत पोहोचण्यास सोयीचे होणार आहे.- युवाशक्ती एकत्र आली की, काेणतेही कार्य सहज पार पडते, असाच अनुभव कालवा दुरूस्तीच्या कामात ग्रामस्थांना आल्याचे दिसून येते.