ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे : नाल्यांचा उपसा रखडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नगर पंचायतीचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : राजनगरी म्हणून ओळख असलेल्या अहेरी शहरात स्वच्छतेची पूर्णपणे वाट लागली आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे उभे झाले आहेत. कचरापेटीमध्ये टाकलेला कचरा नियमितपणे उचलला जात नाही. त्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. कचऱ्यामुळे पावसाळ्यात दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अहेरी उपविभागातील सर्वात मोठे शहर म्हणून अहेरीची ओळख आहे. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत झाले. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पंचायत नियोजनबध्द काम करेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र नगर पंचायत स्थापन होऊन सुध्दा स्वच्छतेच्या बाबतीत कोणताच फरक पडला नाही. पूर्वी प्रमाणेच कचऱ्याचे ढिगारे आजही कायम आहेत. किंबहुना काही वार्डांमध्ये कचऱ्याची समस्या अधिक तीव्र झाली आहे. राजवाडाकडे जाणाऱ्या मार्गावर कचरा पसरला आहे. याच मार्गावर आदिवासी विकासचे वसतिगृह व स्वयंम अपार्टमेंट आहे. येथील नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाजवळ कचराकुंडी आहे. सदर कचराकुंडी कचऱ्याने पूर्णपणे भरली आहे. मात्र येथील कचरा उचलण्याकडे नगर पंचायत दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कचराकुंडीच्या सभोवताल कचरा पडला आहे. पावसाळ्यापूर्वी या संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.
अहेरी राजनगरीत स्वच्छतेची ऐसीतैशी
By admin | Published: May 23, 2017 12:44 AM