प्रवाशांची अडचण : अवैध वाहतूक वाढल्याने एसटीला फटकाआलापल्ली : येथील बसस्थानकातील चौकशी कार्यालय मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने अवैध वाहतूक वाढली आहे. त्याचबरोबर प्रवाशांनाही माहिती मिळण्यास अडचणत होत आहे. त्यामुळे सदर बसस्थाकात वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.आलापल्ली येथून सिरोंचा, भामरागड, गडचिरोली कडे जात असल्याने जिल्हाभरातील बसेस व खासगी प्रवासी वाहने याच ठिकाणावरून पुढचा प्रवास करतात. परिणामी येथील बसस्थानकावर बसेस व खासगी प्रवासी वाहनांची गर्दी राहते. येथील बसस्थानकावर वाहतूक नियंत्रित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना पासचे वितरण करण्याच्या उद्देशाने वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली होती. चौकशी कार्यालयातील वाहतूक नियंत्रक आलापल्ली येथे येणाऱ्या बसेसची वेळही सांगत होता. त्यामुळे प्रवाशांसाठी सोयीचे होत होते. वाहतूक नियंत्रकाच्या धाकामुळे खासगी वाहनधारक बसस्थानकापासून काही दूर अंतरावर वाहने उभी ठेवून प्रवाशांची उचल करीत होते. मात्र एसटी विभागाने या ठिकाणचे वाहतुक नियंत्रक पद गोठविल्याने कार्यालय बंद पडले आहे. परिणामी आता खासगी वाहनधारकांनी वाहने बसस्थानकाच्या समोरच लावण्यास सुरूवात केली आहे. एसटी व खासगी वाहने यांच्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. खासगी प्रवासी वाहने प्रवाशांची उचल करीत असल्याने एसटीला प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही पासेससाठी अहेरीला जावे लागत आहे. या सर्व अडचणी लक्षात घेता या ठिकाणी वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करून कार्यालय सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
आलापल्ली बसस्थानकातील चौकशी कार्यालय बंद
By admin | Published: February 14, 2016 1:26 AM