लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य सेविकाच नाही
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३६ आरोग्य पथक व ३७६ उपकेंद्र आहेत. या सर्व ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आरोग्य सेवा देण्याचे काम परिचारिका करते. मात्र जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत परिचारिकांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात दर हजारी परिचारिकांचे प्रमाण ५.३१ टक्के आहे.
हेमाडपंथी शिवमंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिव मंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंथी आहे.अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते. या मंदिरातून भूयार जात असून तो भूयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघतो, असा पारंपरिक समज आहे. त्यामुळे या मंदिराचा विकास करावा.
मार्ग खोदून खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा
देसाईगंज: शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
भेंडाळा-आष्टी मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी
चामोर्शी : भेंडाळा-आष्टी मार्गावर अनेक गावे आहेत. भेंडाळा परिसरातील नागरिक आष्टीला जाण्यासाठी चामोर्शीवरून न जाता लखमापूर बोरी मार्गे जाणाºया मार्गाने आष्टीला जातात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.
जळाऊ लाकडाच्या तुटवड्याने नागरिक त्रस्त
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. मात्र स्थानिक नागरिकांना वन विभाग सरपणासाठी लाकूड उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे बहुतांश डेपोंवर जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
चतुर्थ श्रेणी दर्जापासून कोतवाल वंचित
आष्टी : गावात दवंडी देणे, मृतदेहाची विल्हेवाट लावणे, शेतसारा जमा करणे, अशी विविध कामे करणाºया जिल्हाभरातील साजा अंतर्गत कोतवालांना महिन्याकाठी अल्प मानधन दिले जात आहे. वारंवार मागणी करूनही कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देऊन त्यांना नियमित वेतन देण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.
वाहनांच्या गतीला आवर घाला
चामोर्शी : जिल्हाभरातून प्रमुख मार्गांवर भरधाव वाहनांमुळे पहाटेच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना अपघाताचा धोका होऊ शकतो. त्यामुळे वळण मार्गावर गतिरोधक लावून वाहनांच्या गतीला आवर घालण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक
धानोरा : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावात अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी आहे.