लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीचे शालेय सत्र सुरू होऊन चार महिने लोटले तरी राज्यस्तरावर पोषण आहाराचा नवीन कंत्राट करण्यात आला नाही. परिणामी जिल्हास्तरावर पोषण आहाराचा पुरवठाच बंद आहे. तात्पुरत्या स्वरूपात शाळांच्या मुख्याध्यापकांनी पोषण आहाराचा खर्च करावा अशी सूचना शिक्षण संचालकांनी केली असली तरी एवढ्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा खर्च करणे मुख्याध्यापकांना अशक्य झाले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी घराची वाट धरावी लागत आहे.जिल्ह्यात खासगी आणि जिल्हा परिषदेच्या मिळून १७८७ शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत १ लाख १९६ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात वर्ग १ ते ५ चे ६३ हजार ६५५ तर वर्ग ६ ते ८ चे ३६ हजार ५४१ विद्यार्थी आहेत. प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणीचे, उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी, विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहाराची योजना सुरू आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ वातावरणात पौष्टिक असा सकस आहार देऊन सुदृढ पिढी घडविणे हासुद्धा यामागील एक उद्देश आहे. पण राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे आज शाळांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयाकडे विचारणा केली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात पोषण आहारासंदर्भातील एक याचिका निकाली निघायची असल्यामुळे यावर्षीच्या शालेय सत्राकरिता निविदा प्रक्रियेला उशिर होत असल्याचे सांगण्यात आले. तोपर्यंत शाळांच्या मुख्याध्यापकांनीच विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची व्यवस्था करावी असे सूचविले. मात्र एवढ्या संख्येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा खर्च करणे मुख्याध्यापकांना अशक्यप्राय झाले आहे. परिणामी मध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थ्यांना आपापल्या घराची वाट धरावी लागत आहे किंवा घरून आणलेला डबा खावा लागत आहे. जुन्या कंत्राटदाराने १६ जूनपर्यंत पुरविलेला साठा जुलै-आॅगस्टपर्यंत पुरला. पण आता दोन महिन्यांपासून पोषण आहाराचे वांदे सुरू आहेत.तांदूळ पुरवठ्याचेही गौडबंगालगेल्यावर्षीपासून तांदळाचा पुरवठा कंत्राटदाराकडून न करता वडसा येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामातून केला जात आहे. यावर्षीही गेल्यावर्षीच्या वाहतूकदाराला तांदळाचा पुरवठा करण्यास सांगितले. परंतू श्रीहरी राईस अॅग्रो लि.गोंदिया या वाहतूकदाराने केवळ जुलै-आॅगस्ट महिन्यातच तांदूळ पुरविले. नंतर तांदूळही पोहोचले नाही. त्यामुळे हे तांदूळ कुठे गायब झाले? असा प्रश्न अनेक शाळांना पडला आहे.काही मुख्याध्यापक उसनवारीवर साहित्य आणत आहेत. पण पटसंख्या जास्त असल्यामुळे इतके दिवस उधारी ठेवणे कठीण झाले आहे. तांदळाचा पुरवठा आम्ही करू, बाकीचे साहित्य तुम्ही खरेदी करून नंतर बिल सादर करा असे सांगितले होते. पण दोन महिन्यांत अनेक ठिकाणी तांदूळही पुरवठा केला नाही. त्यामुळे पोषण आहार देणे कठीण झाले आहे.- संजय नार्लावर, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ
पोषण आहार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 10:28 PM
यावर्षीचे शालेय सत्र सुरू होऊन चार महिने लोटले तरी राज्यस्तरावर पोषण आहाराचा नवीन कंत्राट करण्यात आला नाही. परिणामी जिल्हास्तरावर पोषण आहाराचा पुरवठाच बंद आहे.
ठळक मुद्देतांदळाचाही पुरवठा नाही : साहित्य खरेदीचे वांदे