वैरागड : उन्हाळी धान पीक निघून १५ दिवसांचा कालावधी उलटला असला तरी वैरागड परिसरातील देलनवाडी येथील धान खरेदी केंद्र अजूनही सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी देलनवाडी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाला सोमवारी घेराव घातला. वैरागड परिसरातील काही शेतीला जलसिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याने उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. उन्हाळी धान पीक मे महिन्याच्या सुरुवातीलाच निघाले. या धानाच्या खरेदीसाठी १५ मे ते ३० जून या कालावधीपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू करणे सुरू करणे आवश्यक होते. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ४० धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. मात्र आरमोरी तालुक्यात एकही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी गोदामातून खरीप हंगामाच्या धानाची उलच झाल्याबरोबर धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश आदिवासी विकास महामंडळाला दिले होते. मात्र आमदारांच्याही निर्देशाला केराची टोपली दाखवत धान खरेदी केंद्र सुरू केले नाही.खरीप हंगामासाठी बियाणे, खत खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी धान विक्री करण्याची लगबग सुरू केली आहे. मात्र धान खरेदी केंद्रच सुरू न झाल्याने धान कुठे विकावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आदिवासी विविध कार्यकारी संस्था देलनवाडीचे व्यवस्थापक यांना घेराव घालून धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली. चार दिवसांत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. घेरावानंतर आदिवासी विकास महामंडळ कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
देलनवाडी धान केंद्रासाठी व्यवस्थापकाला घेराव
By admin | Published: May 31, 2016 1:23 AM