ऑनलाईन लोकमतकुरखेडा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत रामगड गट ग्राम पंचायतींमार्फत मागील दोन वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे हाताला काम नसलेल्या संतप्त नोंदणीकृत मजुरांनी ग्राम पंचायत कार्यालयात धडक देऊन ग्रा. पं. पदाधिकारी व ग्रामरोजगार सेवकाला घेराव घालून या बाबीचा जाब विचारला. दरम्यान यावेळी ताणतणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती.रामगड गट ग्राम पंचायतीमध्ये पदाधिकारी, ग्रामरोजगारसेवक यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे ग्रा. पं. ची प्रशासकीय व्यवस्था पूर्णत: ढेपाळली आहे. अंतर्गत वादामुळे मागील चार महिन्यांपासून या ग्राम पंचायतीची मासिक सभा झाली नसल्याची माहिती उजेडात आली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत येथे ८३४ मजुरांची नोंदणी करण्यात आली आहे. ग्रा. पं. च्या आराखड्यात अनेक कामांना मंजुरी आहे. मात्र पदाधिकारी व रोजगारसेवक व ग्रामसेवकांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याने गेल्या दोन वर्षांपासून गावात रोहयोची कामे सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे ८३४ मजूर रोजगारापासून वंचित आहेत. संतप्त मजुरांनी मागील तीन दिवसांपासून ग्राम पंचायतीवर धडक देत पदाधिकारी व ग्रामरोजगारसेवकास जाब विचारत ग्राम पंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.या प्रकरणाची माहिती मिळताच पं. स. उपसभापती मनोज दुनेदार यांनी पंचायत विस्तार अधिकारी पारधी यांच्यासह मंगळवारी ग्रा. पं. कार्यालयाला भेट दिली. यावेळी सरपंच, उपसरपंच व मजुरांची संयुक्त बैठक घेऊन समजूत घातली. पुढील आठवड्यात रोहयोची कामे सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मजुरांनी मागे घेतले.
रोहयो कामासाठी घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 1:30 AM
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत रामगड गट ग्राम पंचायतींमार्फत मागील दोन वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात आली नाही.
ठळक मुद्देमजूर आक्रमक : ग्रा.पं.कार्यालयात जाऊन रोजगार सेवकाला विचारला जाब