लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : जिल्हा मुख्यालयापासून १२० किमी लांब असलेल्या नक्षलग्रस्त, डोंगराळ व दुर्गम भागातील पेसा ग्रामपंचायत असलेल्या कोचीनाराने आयएसओ मानांकन पटकावले आहे. हा बहुमान पटकावणारी तालुक्यातील पहिली, तसेच नवीन आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यापूर्वी या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, महाआवास अभियान पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये आता आयएसओ मानांकनाची भर पडली आहे. दिनांक ४ मे २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय कोचीनारा येथे आएसओ मानांकन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर आयएसओ लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, तर प्रमुख अतिथी म्हणून कोरचीचे तहसीलदार छगनलाल भंडारी, गटविकास अधिकारी राजेश फाये, काँग्रेसचे जिल्हा महासचिव मनोज अग्रवाल, मुख्याध्यापक शालिक कराडे, आशिष अग्रवाल, बेतकाठीच्या सरपंच कुती हुपुंडी, नागपूरचे आयएसओ ऑडिटर विनोद कोल्हे व शुभम मारबते, सरपंच सुनीता मडावी, उपसरपंच रुपराम देवांगण, ग्रामसेवक दामोदर पटले, पोलीस पाटील श्रावण घावडे, ग्रामसेवक संघटनेने विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.गटविकास अधिकारी राजेश फाये यांनी ग्रा.पं.ला शुभेच्छा देत तालुक्यातील इतरही ग्रामपंचायतींनी कोचीनाराचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. सरपंच सुनीता मडावी यांनी ग्रामसेवक दामोदर पटले यांच्या मागदर्शनाने व सर्व सदस्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पुढेही गावाच्या विकासासाठी कार्य करत राहू, असे सांगितले. या कार्यक्रमासाठी ग्रा.पं.चे सर्व पदाधिकारी, ग्रामस्तरीय सर्व कर्मचारी, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांनी परिश्रम घेतले. संचालन हिरामन मेश्राम, तर आभार उपसरपंच रुपराम देवांगण यांनी मानले.
स्वप्न पूर्ण, आता दर्जाही टिकविणारप्रास्ताविकात ग्रामसेवक दामोदर पटले यांनी ग्रामपंचायतीचा जलद गतीने विकास होण्यासाठी ग्रामपंचायत आयएसओ करणे माझे स्वप्न होते, ते आज प्रत्यक्षात साकारले. त्यासाठी ग्रा.पं.चे सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली. ग्रामपंचायतचा हा आयएसओ दर्जा टिकवणे, गतिमानता व लोकाभिमुख कार्य करणे हे आमचे कर्तव्य असून आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली.