लोकमत न्यूज नेटवर्क कमलापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून दुर्गम भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या; परंतु दुर्गम भागातील नागरिक अशिक्षित असल्याने दुर्गम भागातील प्रवाशांकडून वाहकांद्वारे पैसे वसूल केले जाते. मात्र, तिकीट दिले जात नाही, असा प्रकार नेहमीच होत असतात. एकूणच प्रवाशांकडून पैसे घेतात; पण तिकीट देत नाही, तक्रार करायची तरी कुठे? असा प्रसंग मंगळवारी अहेरी उपविभागाच्या बसफेरीमध्ये प्रवाशांना प्रत्यक्ष अनुभवास आला.
सकाळी दामरंचा येथून येणारी बस भरगच्च प्रवासी घेऊन येत होती. मध्यंतरी असलेल्या गावातील नागरिकांना बसमध्ये उभे राहण्यासाठी सुद्धा जागा नव्हती त्यामुळे वाहन थांबवले नाही, असे असताना सुद्धा बसवाहकाने अनेक प्रवाशांकडून पैसे घेतले; परंतु तिकीट दिले नाही. भोळ्याभाबळ्या जनतेला कोणाकडे तक्रार करायची व कशी तक्रार करायची, केल्यास काय करावे लागेल याची जाणीव असल्याने मूग गिळून गप्प बसले. काही सुशिक्षित लोक बसमधून उतरून सदर प्रकाराची माहिती बसमध्ये असलेल्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना सांगितली.
राज्य शासनाने विविध कल्याणकारी योजना प्रवाशांकरिता राबवून प्रवासी वाढविणे हे एकमेव उद्देश ठेवले आहे; परंतु अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करतात. दुर्गम भागात प्रवासी जास्त राहतात; परंतु वाहकाकडून तिकीट न दिल्याने प्रवाशांची संख्या कमी दिसून येते. त्यामुळे बस तोट्यात आहे असे सांगून काही दिवसांनंतर बसफेरी बंद केली जाते. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना त्रास होतो. या गैरप्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे असा प्रश्न आहे.
आगारप्रमुख म्हणतातलेखी तक्रार द्या अहेरी आगार प्रमुखांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केले असता त्यांनी आमच्याकडे लेखी तक्रार नाही. वाहन क्रमांक काय? असा उलट सवाल त्यांनी केला. यामुळे वाहकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वाद तर नाही ना, असाही सवाल व्यक्त केला जात आहे.