लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने निधी मंजूर करून दिला आहे. सदर पुलाच्या बांधकामासाठी माती परीक्षणाचे काम सुरू झाले असून सप्टेंबर महिन्यापासून पुलाच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे.आष्टीनजीकच्या वैनगंगा नदीवर ठेंगणा पूल असल्याने पावसाळ्यात अनेकदा या परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. पूरपरिस्थितीमुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटतो. त्यामुळे सदर नदीवर नव्याने पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आष्टीवासीयांकडून सातत्याने होत होती. आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवरील पूल हा ब्रिटिश सरकारच्या काळात बांधण्यात आला होता.१०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा पूल बराच ठेंगणा आहे. पावसाळ्यात पुरामुळे पुलावर पाणी राहत असल्याने आष्टी-चंद्रपूर मार्ग बऱ्याचदा तीन ते चार दिवसांसाठी बंद होत असतो. दरम्यान एखादा गंभीर रुग्ण असल्यास त्याला औषधोपचारासाठी नेता येत नाही. या पुलावर आतापर्यंत अनेकदा अपघात होऊन बऱ्याच जणांना जीव गमवावा लागला आहे. चारचाकी वाहने पुलावरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सदर पुलाचे काम हैदराबाद येथील कंपनीमार्फत होणार असून सप्टेंबर महिन्यात कामाला सुरूवात होणार आहे. दोन वर्षात या पुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ब्रिटिशकालीन आष्टी येथील पुलाचा शिलान्यास महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.सा.कन्नमवार यांच्या हस्ते करण्यात आला होता.
आष्टीत पुलासाठी माती परीक्षणाच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 5:00 AM
पूरपरिस्थितीमुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटतो. त्यामुळे सदर नदीवर नव्याने पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आष्टीवासीयांकडून सातत्याने होत होती. आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवरील पूल हा ब्रिटिश सरकारच्या काळात बांधण्यात आला होता.
ठळक मुद्देदोन वर्षात होणार काम पूर्ण : वैनगंगा नदी पुलासाठी निधी उपलब्ध