लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणीत रिक्त पदांचा मोठा अडथळा असल्याची बाब बुधवारी राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या लक्षात आली. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दौरा करून त्यांनी समस्यांचे मूळ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी रिक्त पदांमुळे योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. याशिवाय अपेक्षित सोईसुविधांचा अभाव असून त्यात सुधारणा करण्यास वाव असल्याची नोंद त्यांनी आपल्या निरीक्षणात घेतली.विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ.संदीप राठोड, आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (महिला व बालविकास) आर.एल. लामतुरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम आणि इतर अधिकारीगण या दौऱ्यात उपस्थित राहून आपापल्या विभागाची माहिती देत होते.सकाळी ८.३० वाजता बोदली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून या भेटींना सुरूवात झाली. चातगावच्या अंगणवाडीतील मुले चांगली प्रशिक्षित होती. पण इमारतीच्या गळक्या छताला तात्पुरते आवरण लावले होते. सोडे येथील अंगणवाडीत मात्र अमृत आहाराचे कडधान्य पोहोचलेच नव्हते. या गावातील रेशन कार्डवर धान्य पुरवठ्यातही गडबड असल्याचे निदर्शनास आले.मेंढा या गावात देवाजी तोफा, प्रा.कुंदन दुफारे, ग्रामसेवक आर.एच.कुनघाडकर यांनी त्यांचे स्वागत करून उपक्रमांची माहिती दिली. याशिवाय गावाजवळच्या वनतलावातील गाळ काढण्याची मागणी केली.६० ते ७० टक्के मुली अॅनिमियाग्रस्तसोडे या गावातील शासकीय कन्या आश्रमशाळेतील महिला वैद्यकीय अधिकाºयाने ६० ते ७० टक्के मुली अॅनिमियाग्रस्त असल्याचे सांगितले. त्यांचे हिमोग्लोबिन ९ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त नाही. त्यांना अतिरिक्त पोषक घटक दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. परंतू त्या मुली आता वसतिगृहात नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी पंडित यांनी मुलींची थायलेसेमिया तपासणीही करण्याची सूचना केली.रोजगाराअभावी उद्भवले अनेक प्रश्नकुपोषण, आरोग्य हे प्रश्न रोजगाराअभावी निर्माण झाले आहेत. गर्भवती किंवा स्तनदा मातांना सध्या अमृत आहार योजनेतून घरी शिजवण्यासाठी दिले जात असलेले कडधान्य ती एकटीच खात नाही. त्यात घरातील सर्वच लोक वाटेकरी होतात. परिणामी त्या आहारातून तिला आवश्यक असलेले पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाही. संपूर्ण कुटुंबालाच पोषक आहाराची गरज आहे. पण आर्थिक स्थितीमुळे त्यांना ते शक्य होत नाही, असे निरीक्षण समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी नोंदविले.
समितीपुढे वाचला रिक्तपदांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 10:32 PM
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणीत रिक्त पदांचा मोठा अडथळा असल्याची बाब बुधवारी राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या लक्षात आली. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दौरा करून त्यांनी समस्यांचे मूळ जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देसोईसुविधांचा अभाव : भेटीतून आदिवासी समितीने जाणली तथ्ये