गडचिरोली : भारतीय लष्कराने शेतकºयांना मोफत वाटप करण्यासाठी दिलेल्या जवळपास दोन कोटी रुपये किमतीच्या फ्रिजवाल गायी हडपण्याचा प्रयत्न करणाºया प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच्या संचालकावर अखेर सोमवार दि.६ च्या रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली असून दोन दिवसांचा पीसीआरही मिळाला आहे. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेमुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आले होते.
शेतकऱ्यांच्या नावावर आणलेल्या फ्रिजवाल गायी शेतकऱ्यांना न देता आपल्याच ताब्यात ठेवण्याचा सदर कंपनीचा प्रयत्न होता. दोन महिने गायी स्वत:च्या ताब्यात ठेवताना १०० पेक्षा जास्त गायी रहस्यमयरित्या गायबही झाल्या आहेत. त्या गायी मृत झाल्या किंवा कोणाला विकल्या याचे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाही. लोकमतने वृत्तमालिकेतून याकडे लक्ष वेधल्यानंतर जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत पुढील प्रक्रिया केली.
सदर कंपनीचा संचालक घनश्याम तिजारे याला आरमोरी पोलिसांनी मंगळवारी दुपारी भादंवि कलम ४०६ अन्वये अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा पीसीआरही दिला. मात्र या कंपनीच्या इतर संचालकांवर अद्याप कारवाई झालेली नाही. याशिवाय महागड्या दुधाळू गाई परस्पर गायब केल्या असताना चोरी किंवा फसवणुकीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला नाही.