गडचिराेली : केंद्र शासनाने खरीप विपणन हंगाम २०२३-२४ करिता पिकांसाठी आधारभूत हमीभाव किंमत जाहीर केली. यात मका व धान उत्पादक शेतकऱ्यांची माेठ्या प्रमाणात निराशा झाली. मक्याला केवळ १२८ व धानाला १४३ रुपये प्रति क्विंटल दरवाढ मिळाली तर मूग, तीळ, भुईमूग व कापूस पिकाला घसघशीत वाढ मिळाल्याने ही पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची बल्लेबल्ले झाली. गडचिराेलीसह पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांची ३ हजार रुपये हमीभावाची मागणी शासन दरबारी प्रलंबितच राहिली.
काेकणासह पूर्व विदर्भातील गडचिराेली, चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया आदी जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन माेठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या ‘अ’ दर्जाच्या धानाला २,०६० तर साधारण धानाला २,०४० रुपये प्रति क्विंटल दर आहे. हा दर २०२२-२३ या वर्षातील धान पिकासाठी लागू हाेता. आता २०२३-२४ या वर्षातील पिकांना केंद्र शासनाने ७ जून २०२३ राेजी जाहीर केलेले हमीभावाचे दर लागू हाेतील. ज्याप्रमाणे केंद्र शासनाने मध्यम दर्जाच्या कापसाला ५४० रुपये तर लांब धाग्याच्या कापसाला ६४० रुपये प्रति क्विंटल वाढ जाहीर केली. त्यामुळे आता कापसाचे अनुक्रमे दर ६ हजार ६२० व ७ हजार २० रुपये झाले आहेत. याशिवाय मुगाच्या दरात ८०३ रुपयांची वाढ झाल्याने मुगाचे दर ८ हजार ५५८ रुपये तर तिळाच्या दरात ८०५ रुपयांची वृद्धी झाल्याने तिळाचे दर ८ हजार ६३५ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पाेहाेचले. परंतु, धान व मका उत्पादकांना दीडशेच्या आतच किंमतवृद्धी देऊन धान उत्पादकांच्या ताेंडाला केवळ आश्वासनांची पाने पुसली.
दहा वर्षांत सर्वाधिक तिळाच्या दरात वाढगत दहा वर्षांत म्हणजेच २०१४-१५ ते २०२३-२४ या वर्षांत हमीभावाच्या दरात सर्वाधिक वाढ तिळाच्या दरात झाली. २०१४-१५ मध्ये तिळाचे दर ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल हाेते. तर २०२३-२४ साठी ८ हजार ६३५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. दहा वर्षांत ४ हजार ३५ रुपयांची वाढ झाली. ही वाढ अन्य पिकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या खालाेखाल मुगाच्या दरात ३ हजार ९५८ रुपयांची उच्चांकी वाढ झाली. एवढा तर धानाचासुद्धा एकूण हमीभाव नाही.
कापूस अडीच हजारांवर तर धान हजाराच्या आतदहा वर्षांपूर्वी धानाला हमीभाव १ हजार ३६० व १ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल हाेता. साेयाबीनलासुद्धा २ हजार ५६० रुपये दर हाेता, तर कापूस मध्यम धागा ३ हजार ७५० व लांब धागा ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल हाेता. २०२३-२४ करिता धानाचे दर २ हजार १८३ व २ हजार २०३ रुपये प्रति क्विंटल जाहीर झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत धानाला केवळ ८२३ व ८०३ रुपये हमीभाव वृद्धी मिळाली तर मध्यम धाग्याच्या कापसाला २ हजार ८७० रुपये तर लांब धाग्याच्या कापसाला २ हजार ९७० रुपयांची हमीभाव वाढ मिळाली.