आरोग्य सेविकेची तक्रार : गैरवर्तणूक केल्याचा आरोपकमलापूर : कमलापूर आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेविका मंजुळा मनसराम सडमाके यांनी अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी शिवराम कुमरे यांच्या विरूद्ध अहेरी पोलीस ठाण्यात १८ मे रोजी तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत आरोग्य सेविकेने म्हटले आहे की, २००३ पासून आपण आरोग्य सेविका पदावर कार्यरत आहो. १४ आॅगस्ट २००५ पासून मांडरा रुग्णालयात कार्यरत आहे. तालुका आरोग्य अधिकारी कारण नसताना जिथे जिथे भेटतात तेथे तेथे मी तुला नोकरी करू देणार नाही, तसेच तु नोकरी कशी करते, मी पाहून घेईल, अशी धमकी देत असतात. आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिनस्त कर्मचारी असल्याने आपण आजपर्यंत वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली नाही. १६ मे रोजी अहेरी पंचायत समितीतील सर्व आरोग्य केंद्रांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सभा घेण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवराम कुमरे, डॉ. पांढरे तसेच महागाव व जिमलगट्टाचे डॉक्टर उपस्थित होते. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी अर्भक मृत्यूबाबत आपल्याला उलटसुलट प्रश्न विचारून १२.३० वाजतापासून ५ वाजेपर्यंत उभे ठेवले. पाणी पिण्याची व औषध घेण्याची परवानगी मागितली असता, शिवीगाळ केली. तू कामचोर आहे, असे म्हटले व माझी तक्रार वरिष्ठाकडे केल्यास जीवानिशी ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली, असे पोलिसांना आरोग्य सेविकेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आरोग्य सेविकेने केली आहे.यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवराम कुमरे यांना विचारणा केली असता, मिटींगमध्ये सदर आरोग्य सेविकेला मी बोललो, परंतु लाज, शरम काढली नाही व कुठल्याही प्रकारची धमकी दिली नाही. या सभेत सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. माड्रा येथे अर्भक मृत्यू झाला. त्याचा अहवाल नव्हता. एका स्लाईडचे बारा स्लाईड बनविले. रिपोर्टिंग करता येत नाही, अशा कर्मचाऱ्यांना अधिकारी म्हणून रागाविणे, समजाविणे हा एक भाग ठरतो, या आधीही गोविंदगाव येथे कार्यरत असताना पेमेंटसुद्धा काढले नाही, अशी तक्रार सदर आरोग्य सेविकेने केली होती. मेडिकल सुट्या टाकून घरी गेल्या व माड्रा येथे बदली करून घेतली. आपल्यावरचे सर्व आरोप निराधार आहे, असे कुमरे यांनी म्हटले आहे. आरोग्य सेविकेच्या पतीचा इगो तक्रारीमागे कारणीभूत आहे, असे डॉ. शिवराम कुमरे लोकमतशी बोलताना म्हणाले. (वार्ताहर)
तालुका आरोग्य अधिकाऱ्याविरोधात अहेरी पोलिसात तक्रार
By admin | Published: May 26, 2016 2:31 AM