फायर लाईन कामात भ्रष्टाचारअहेरी : बोगस मजुरांच्या नावावर पैसे उचलून फायरलाईनच्या कामात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी वनविभागाने चार वनकर्मचाऱ्यांविरुद्ध अहेरी पोलिस ठाण्यात तक्रार केल्याने खळबळ माजली आहे.आलापल्ली वनविभागांतर्गत कंसोबा(मार्र्कंडा) वनपरिक्षेत्रात मार्च २०१३ मध्ये फायरलाईनचे काम करण्यात आले. या कामात भ्रष्टाचार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घोट येथील सामाजिक कार्यकर्ते तरुण शहा यांनी माहितीच्या अधिकाराखाली वनविभागाकडून माहिती मागितली. त्यानंतर त्यांनी या कामात बोगस मजुरांच्या नावावर संबंधित वनकर्मचाऱ्यांनीच मजुरीची रक्कम हडपल्याची तक्रार वरिष्ठ वनाधिकारी, वनमंत्री व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील सहायक वनसंरक्षक कोवे यांनी सदर प्रकरणाची चौकशी करुन आॅगस्ट २०१६ मध्ये मुख्य वनसंरक्षक पी.कल्याणकुमार यांना अहवाल सादर केला. या अहवालात तत्कालीन प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी तथा रेंगेवाहीचे क्षेत्रसहायक एस.डी.खोब्रागडे, गुंडापल्लीचे क्षेत्रसहायक टी.एस.बनपूरकर, ए.एम.पोतगंटीवार व अडपल्लीचे सी.सी.भडके यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले. यामुळे मुख्य वनसंरक्षकांनी या चारही वनकर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अधिनस्थ वनाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार २६ सप्टेंबरला चारही जणांविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अहेरी पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत असून, भ्रष्टाचाराबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आल्याने वनकर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)
चार वनकर्मचाऱ्यांविरूध्द पोलिसांत तक्रार
By admin | Published: October 02, 2016 1:52 AM