झिंगानूर ग्रामपंचायतअंतर्गत झिंगानूर चेक नंबर १, झिंगानूर चेक नं. २, झिंगानूर माल, मंगीगुडम, पुल्लीगुडम, वडदेली, येडसिली आदी गावांतील मजुरांनी तेंदुपत्ता संकलनाचे काम केले. तेंदुपत्ता मजुरीचे पैसे बाेनससह लवकर मिळतील, अशी अपेक्षा मजुरांना हाेती; परंतु मजुरांचा हिरमाेड झाला. झिंगानूरच्या ग्रामपंचायतमध्ये कंत्राटदाराच्या उपस्थितीत हंगामापूर्वी लिलाव प्रक्रिया पार पडली हाेती. प्रति पुडा ११ रुपयांप्रमाणे शेकडा १ हजार १०० रुपये दर तेंदुपत्त्याला मिळाला. उन्हाळ्यात तेंदुपत्ता संकलन केल्यानंतर १५ दिवसांत पैसे दिले जातील, असे संबंधित कंत्राटदाराने सांगितले हाेते. आठ दिवसांच्या कामापैकी केवळ तीन दिवसांचे पैसे मजुरांना मिळाले. उर्वरित ५ दिवसांचे पैसे कंत्राटदाराने मजुरांना दिले नाहीत. कंत्राटदाराशी आता माेबाइलवर संपर्क हाेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याेग्य कारवाई करावी, अशी मागणी समय्या मडावी, सुंगा आत्राम, चिंतामण कुळमेथे यांच्यासह सात गावांतील मजुरांनी ठाणेदारांकडे केली आहे.
पैसे थकविणाऱ्या कंत्राटदारांची पाेलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:39 AM