गडचिरोली : आलापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत विविध कामांसह खरेदी व्यवहारात गैरव्यवहार केल्याची तक्रार सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगाजी कुडवे यांनी केली होती. त्यानंतर कारवाईच्या मागणीसाठी वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या दिला होता. दरम्यान, तक्रारीचे गांभीर्य पाहून वनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी अखेर आलापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी योगेश शेरेकर यांना निलंबित केले.
आलापल्ली वनपरिक्षेत्रात रूजू झाल्यापासून शेरेकर यांनी विविध कामांसह खरेदीमध्ये अफरातफर केल्याचा योगाजी कुडवे यांचा आरोप होता. त्यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कामांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. यानंतर त्यांनी ९ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले. यादरम्यान त्यांनी वनविभागाकडे शेरेकरांच्या कारनाम्यांचे पुरावेदेखील सादर केले. अखेर याची दखल घेत वनसंरक्षकांनी शेरेकर यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
उपोषणाच्या १४व्या दिवशी निलंबन
वनपरिक्षेत्राधिकारी शेरेकरांच्या निलंबनासाठी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष याेगाजी कुडवे हे सहकाऱ्यांसमवेत मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. २२ ऑगस्टला आंदोलनाचा १४वा दिवस होता. अखेर दुपारनंतर वनसंरक्षक (प्रादेशिक) एस. रमेशकुमार यांनी शेरेकरांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. योगाजी कुडवेंसह रवींद्र सलोटे, नीळकंठ संदोकर, चंद्रशेखर सिडाम, आकाश मट्टामी, प्रणय खुणे, शंकर ढोलगे, विलास भानारकर, कलम शहा आदी उपस्थित होते.