चामोर्शीत आढावा बैठक : आमदारांचे अधिकाऱ्यांना निर्देश चामोर्शी : भाजप सरकारने अनेक लोकोपयोगी योजना आणून विकासाची गंगा गावागावांत पोहोचविली. समाजातील शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी शासनाच्या विविध योजना राबवून विकासकामे वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश आ. डॉ. देवराव होळी यांनी दिले. चामोर्शी येथील पंचायत समितीच्या आढावा बैठकीत शनिवारी ते बोलत होते. यावेळी पं. स. सभापती आनंद भांडेकर, माजी उपसभापती केशव भांडेकर, तहसीलदार अरूण येरचे, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के, सिंचाई विभागाचे साईनाथ दुम्पट्टीवार, राजू चुधरी, जयराम चलाख, राजू वरघंटीवार, प्रकाश सातपुते, पं. स. अधीक्षक पारधी, विस्तार अधिकारी भोगे उपस्थित होते. सिंचाई विभागातील प्रलंबित विकास कामे, सुरू असलेली कामे यांची माहिती घेऊन ती कामे पूर्ण करावीत, नवीन कामाचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. पाटबंधारे सिंचाई विभागाची माहिती डी. व्ही. लांडगे यांनी दिली. नहराची दुरूस्ती नहरावर मुरूमकाम, गेट, व्हॉल्व दुरूस्ती व तलावातील मातीकाम याबाबत माहिती दिली. कृषी विभागाच्या मार्फतीने शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, किटकनाशके, शेती उपयोगी साहित्य, विहीर व महिला गटांसाठी मिनी राईसमिलचे वाटप ३० टक्के रकमेत दिली जात आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागातील अर्धवट असलेली कामे पूर्ण करावी, पूर्ण झालेल्या कामाजवळ माहिती फलक लावावे, असे निर्देश आमदारांनी दिले. पंचायत समिती स्तरावरील २५-१५ व १४ व्या वित्त आयोगातील विकास कामांचा आढावा घेऊन घरगुती, शेतीसाठी लागणारे वीज कनेक्शन द्यावे, असे निर्देश आ. डॉ. देवराव होळी यांनी अधिकाऱ्यांना दिले. (शहर प्रतिनिधी)
विकासकामे वेळेत पूर्ण करा
By admin | Published: May 01, 2017 2:19 AM