गडचिरोली ते चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. कंत्राटदाराने एक वर्षापूर्वी गडचिरोली शहरातील डॉ. कुंभारे यांच्या दवाखान्यापासून ते शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत रस्त्याच्या एका बाजूने काम पूर्ण केले. त्यानंतर वर्षभराने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे काम करण्यासाठी कंत्राटदाराने शासकीय विज्ञान महाविद्यालयापासून रस्ता खोदून ठेवला आहे. वाहतुकीच्या दृष्टीने रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक होते; परंतु गेल्या महिनाभरापासून काम बंद आहे. खोदलेल्या रस्त्यामुळे शहरवासीयांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
गडचिरोली शहरातून दिवसभर वहनांची सुरू वर्दळ असते. शहरातून छत्तीसगढ, तेलंगाणा, व अन्य राज्यांतून अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. खोदकामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. चामोर्शी महामार्गावर बाजारपेठ आहे. रस्ता खोदल्यामुळे दुकानदार व ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक दुचाकीचे अपघात होऊन चालकांना दुखापत झाली आहे. अशात अवजड वाहनांमुळे दुचाकीधारकांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते. या गंभीर बाबीची दखल घेऊन तत्काळ रस्त्याचे काम सुरू करून ते आठवडाभरात पूर्ण करावे. काम पूर्ण न केल्यास राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा कात्रटवार यांनी दिला आहे.