मालेवाडा पीएचसीला रुग्णालयाचा दर्जा द्या
कुरखेडा : मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आहे.
मार्गाच्या बाजूला वाहने ठेवणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : शहरातील चारही मुख्य महामार्गांच्या बाजूला ट्रक व इतर वाहने उभी ठेवली जातात. अनेकांकडे जागा नसतानाही वाहने खरेदी केली आहेत. रात्रंदिवस रस्त्यावर वाहने राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सदर वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
स्मशानभूमीत पाणी सुविधेचा अभाव
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी चांगला रस्तादेखील नाही.
जिल्हा स्टेडियम परिसरात होमगार्ड तैनात करा
गडचिरोली : सायंकाळच्या सुमारास शहरातील अनेक महाविद्यालयीन युवक, युवती शारीरिक चाचणीचा सराव करण्यासाठी जिल्हा स्टेडियमवर जात आहेत. तसेच रात्रीचे भोजन आटोपल्यानंतर या भागातील अनेक नागरिक व महिला स्टेडियमकडे फिरावयास जातात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सायंकाळच्या सुमारास होमगार्ड तैनात करावे, अशी मागणी आहे.
गोलाकर्जी मार्गाची दुरुस्ती करा
अहेरी : तालुक्यातील राजाराम खांदला रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची तात्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
झिंगानूर परिसरातील बंधारा दुरुस्तीकडे दुर्लक्ष
झिंगानूर : झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वनविभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्यजीवांसाठीही पाणी राहील, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्प कालावधीतच बंधारा फुटला आहे. जवळपासच्या फरशा पूर्णपणे निघून गेल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी पावसाळ्यातही पाणी साचून राहते.
बोगस डॉक्टरांबाबत आरोग्य विभाग अनभिज्ञ
गडचिरोली : अहेरी उपविभागासह जिल्हाभरात शेकडो बोगस डॉक्टर विनापरवानगीने वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची नेमकी संख्या किती आहे, या संदर्भातील माहिती जि.प.च्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही.
कमी किमतीत दुकान गाळे देण्याची मागणी
गडचिरोली : मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत पोटेगाव मार्गावरील गोंडवन कलादालन परिसरात दुकान गाळे बांधण्यात आले. यातील काही दुकान गाळे भाडे तत्वावर देण्यात आले आहे. उर्वरित गाळे रिकामेच आहेत. जिल्हा प्रशासनाने वाजवी दरात येथील दुकान गाळे बेरोजगारांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करा
गडचिरोली : अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात जमा झाल्यानंतर न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यामध्येच ठेवली जातात. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे या वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी आहे.
औषधांचे बिल न देणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील बहुतांश औषध विक्रेते ओरिजनल बिल ग्राहकाला देत नाही. १० गोळ्यांच्या प्रत्येक स्ट्रीपवर किंमत लिहून राहते. मात्र ग्राहकाने पाच ते सहा गोळ्या खरेदी केल्यास त्यासाठी किती किंमत आकारली जाते, याचा थांगपत्ता लागत नाही.
वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याची मागणी
आष्टी : येथील आंबेडकर चौकामध्ये असलेल्या बसस्थानकाजवळ खासगी प्रवासी वाहनांची नेहमीची गर्दी व व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळे बरेचदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. आंबेडकर चौकात वाहनांची नेहमीच वर्दळ असते. अहेरी व चामोर्शी मार्गाने येथून वाहनांची वर्दळ सुरू असते.
विनापरवानगीने घरांचे बांधकाम वाढले
गडचिरोली : शहरात नगर परिषद प्रशासनाची परवानगी न घेताच दरवर्षी शेकडो घरे बांधली जात आहेत. नगर परिषद कोणतीही कारवाई करीत नसल्याने दरवर्षी विनापरवानगीने बांधणाऱ्या घरांची संख्या शहरात वाढत आहे. त्यामुळे नगर परिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. धोरण कडक करण्याची गरज आहे.