राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मुलांना संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रत्येक शाळेत संगणक लॅब सुरू करण्यात आली. संगणक शिकविण्यासाठी गावातील युवकांना मानधनावर नियुक्त करण्यात आले. मुलांना संगणक हाताळायला मिळत असल्याने त्यांनाही शिक्षणाची गोडी लागलेली होती. त्यानंतर मात्र संगणक शिक्षकांचे मानधन बंद झाले. नियुक्त केलेल्या युवकांनी शाळेला पाठ दाखविली. मुलांना संगणकाचे शिक्षण देणे बंद पडले. त्यानंतर बऱ्याच शाळेतील संगणक लॅब कुणी उघडूनही पाहिली नाही. परिणामी सर्व संगणक धूळखात पडलेले आहेत.
या योजनेमध्ये शासनाचे करोडो रुपये खर्च झाले. त्यातील बरेच संगणक खराब झाले आहेत. त्यामुळे संगणकाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण मिळणे गरजेचे असताना शासनाच्या चुकीमुळे विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहात असल्याचे चित्र जिल्ह्यातील बऱ्याच शाळेत पाहायला मिळत आहे.