आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आदिवासीबहुल व तालुका मुख्यालयापासून शेवटच्या टोकावर असलेल्या नवरगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून सोयीसुविधांचा अभाव आहे. या शाळेला गटग्रामपंचायत कुलकुलीकडून संगणक संच दिल्याचे आणि स्कूलबॅग खरेदी करून विद्यार्थ्यांना वितरित केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात नवरगाव जि.प. शाळेत संगणक संच उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांना स्कूलबॅगसुद्धा मिळालेल्या नाहीत. नवरगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत. येथे दोन शिक्षकांची नियुक्ती आहे. मात्र प्रत्यक्षात एकच शिक्षक कार्यरत असल्याचे दिसून येते. एकाच शिक्षकावर पाच वर्गांचा भार असल्याने विद्यार्थी कसे शिकणार, असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत. काेराेनामुळे सध्या शाळा बंद आहेत. परंतु पाचवीचे वर्ग सुरू आहेत. पाच वर्गांसाठी दाेन शिक्षक असतानाही केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने येथे दुसऱ्या शिक्षकाची लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी उपसरपंच बादलशहा मडावी व ग्रामपंचायत सदस्य माया कोरेटी तसेच पालकांनी सहायक गटविकास अधिकारी एम.ई. कोमलवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बाॅक्स
शाळा अनेक समस्यांनी ग्रस्त
नवरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्युत मीटरचे बिल तीन वर्षांपासून न भरल्याने वीज वितरण कंपनीने पुरवठा खंडित करून मीटर काढून नेले. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शालेय पुस्तकेसुद्धा अनेकांना मिळालेली नाहीत. शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह नाही. तसेच क्रीडा साहित्य, वाचनालय, कचराकुंडी आणि माध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाक गृहाची सोय नाही. शाळेत विविध समस्या आहेत. परंतु या समस्या साेडविण्याकडे दुर्लक्षच झाले. शाळेतील समस्या लवकर साेडवाव्यात, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.