नागरिकांची मागणी
आरमोरी : तालुक्याच्या नागरवाही गावातील डांबरी रस्ते ठिकठिकाणी उखडले असल्याने रहदारीस अडथळा येत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करून नव्याने डांबरीकरण करावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
गावाच्या विकासात रस्ते अधिक महत्त्वाचे मानले जातात. रस्त्यांमुळे बऱ्याच साेयी गावात उपलब्ध होतात. नागरवाही गावात प्रवेश करण्यासाठी दोन रस्ते आहेत. दोन्ही रस्त्यांचे मागील बऱ्याच वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते; परंतु सध्याची परिस्थिती बघता जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागताे. रस्त्यावरील डांबर उखडले आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून वाहन किंवा सायकल चालविताना जागोजागी ब्रेकरवरून जात असल्याचा भास नागरिकांना होताे. अशातच वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची भीती आहे. सायकलस्वारांनासुद्धा या ठिकाणी खड्ड्यांचा मोठा त्रास होत आहे. प्रशासनाकडे बरेचदा निवेदने देऊनही या रस्त्यांचे अजूनपर्यंत नव्याने डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरवाही गावातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करून नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरवाही येथील पीतांबर मडावी, तुळशीराम किरंगे तसेच गावकऱ्यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.