पीक हंगामात शेतातील पीक लागवडीपासून पीक घरी येईपर्यंत शेतात दररोज ये-जा करावी लागते. सध्या रोवणी हंगाम सुरू असून रोवणी कामासाठी शेतात रोवणी कामासाठी उपयोगी असलेले नांगर, फन व इतर साहित्य घेऊन जाण्यासाठी शेतकरी पांदण रस्त्याचा वापर करतात. सध्या भेंडाळा परिसरातील पांदण रस्त्यांची दुरवस्था असल्याने शेतकऱ्यांना बैलबंडी, ट्रॅक्टर तसेच अन्य साधने ने-आण करणे कठीण हाेत आहे. याशिवाय पांदण रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण करून कुंपणाद्वारे रस्ता गिळंकृत केला जात असल्याने ये-जा करण्यास अडचणी येत आहेत. विरुद्ध दिशेने दाेन वाहने एकाच वेळी आल्यास अडचण हाेते.
तालुक्यातील काही गावातील पांदण रस्त्याचे रोहयोतून मातीकाम करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी अजूनही मुरूम व खडीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे आमचा जुनाच रस्ता चांगला होता असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पांदण रस्ते खडीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याने शेतकऱ्यांना पाहिजे त्या वेळी शेतात जाणे अवघड होत असते. तसेच शेतात पिकाला रासायनिक खतांची मात्रा देण्यासाठी काही शेतकरी शिरवजा घेऊन चिखल तुडवित शेतात जातात. त्यामुळे रस्त्याअभावी शेतकऱ्यांना शेती करणे मोठे अडचणीचे झाले आहे. मातीकाम झालेल्या रस्त्यांचे मजबुतीकरण व रस्त्यावर आलेले अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
250821\img-20210825-wa0081.jpg
भेंडाळा परिसरात पांदन रस्ता दाखविताना शेतकरी