घोट : नजीकच्या रेगडी येथील जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या वतीने विश्रामगृह बांधण्यात आले. दरम्यान, २००६ मध्ये नक्षलवाद्यांनी या विश्रामगृहाची जाळपाेळ केली, तेव्हापासून या विश्रामगृहाच्या साेयी-सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या १५ वर्षांपासून विश्रामगृह दुरुस्तीची मागणी हाेत असली तरी याकडे प्रशासनाने कानाडाेळा केला आहे.
जलसंपदा विभाग नागपूर पाटबंधारे विभाग चंद्रपूर व सिंचन उपविभाग चामोर्शी शाखा घोटच्या अंतर्गत येत असलेल्या रेगडी येथे सन १९७३ ते १९७४ साली विश्रामगृह बांधण्यात आलेले होते. दरम्यान, सन २००६ मध्ये नक्षलवाद्यांकडून या विश्रामगृहाची जाळपोळ करण्यात आली होती. रेगडी येथील कन्नमवार जलाशय हे जिल्ह्यातील एकमेव मोठे जलाशय आहे, तसेच या जलाशयावर वनविभागाने वनाेद्यान उभारलेले आहे. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक दरराेज येतात. परंतु, पर्यटकांना विश्राम करण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे जुने विश्रामगृह दुरुस्ती करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.