आरमाेरी : तालुक्यातील काेरेगाव (रांगी) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जीर्ण झाली आहे. मागील दोन वर्षांपासून इमारतीतील दरवाजे, खिडक्या तुटल्या आहेत. विद्युतलाईनही बंद झाली आहे. येथे पिण्याच्या पाण्याची साेय उपलब्ध नाही. त्यामुळे या दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
काेरेगाव परिसरात १० ते १५ गावे आहेत. परिसरातील अनेक पशुपालक जनावरांना उपचारासाठी दवाखान्यात आणतात; परंतु येथे साेयीसुविधांचा अभाव असल्याने पशुपालकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. पशुदवाखान्यातील समस्या मार्गी लागाव्यात, यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे दोन ते तीन वेळा निवेदने दिली; परंतु काहीच उपयाेग झाला नाही. येथील समस्या लक्षात घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे नूतनीकरण करून साेयीसुविधा द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.