सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी
गडचिराेली : तालुक्यातील काही गावांमध्ये असलेल्या हातपंपावर सौरऊर्जा पंप बसवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येथे हातपंपावर सौरऊर्जा बसविल्यास नागरिकांच्या सोयीचे होणार आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांतही सोय होणार आहे. त्यामुळे सौरऊर्जा पंप बसवावा, अशी मागणी आहे.
तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी
देसाईगंज : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
वैरागड : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायत स्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी मजूर नोंदणीपासून वंचित आहेत. बोगस लाभार्थ्यांची नोंदणी होऊन त्यांना लाभ मिळाला आहे. मात्र, काम करणारे लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत.
धूर फवारणी करण्याची मागणी
गडचिराेली : शहरातील काही वाॅर्डात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागांत आरोग्य जागृतीला वेग आला आहे. मात्र, कोरोनासह इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने शहरातील वाॅर्डांमध्ये धूर फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
दुर्गम भागात कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन सुरू
धानोरा : तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी कर्तव्याला दांडी मारली. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडली आहेत. मुख्यालयाची सक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव
धानोरा : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र, या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
आष्टी : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली, तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.
देऊळगाव येथे जलद बसचा थांबा द्या
आरमोरी : देऊळगाव येथून अनेक विद्यार्थी आरमोरी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. शिवाय सिर्सी, इंजेवारी येथील नागरिकही देऊळगाव बसथांब्यावर येऊन बसची प्रतीक्षा करतात. त्यामुळे देऊळगाव येथे जलद बसचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी आहे.
मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला
आष्टी : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. ही कुत्री मुख्य मार्गावर मुक्तसंचार करीत असून, रस्त्यावर इकडे-तिकडे भटकतात.
आरमोरीत स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने अघोषित स्वच्छतागृहे तयार केली आहेत. त्यामुळे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत.
प्रशिक्षण द्यावे
देसाईगंज : मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा आर्थिक स्रोत वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी आहे.
विजेचा लपंडाव वाढला
कोरची : कोरची तालुका नक्षलग्रस्त जंगलाने व्याप्त आहे. तालुक्यातील अनेक गावे डोंगरदऱ्यांत आहेत. त्यामुळे जंगलातून विद्युतलाईन गेली आहे. अनेक वर्षांपासून या भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या आहे. मात्र, या समस्येची सोडवणूक झाली नाही.
मार्गदर्शन शिबिर घ्या
अहेरी : दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. मात्र, नोकरीचे प्रमाण कमी झाल्याने बेरोजगारांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बेरोजगारांना व्यवसायाकडे वळविण्याच्या दृष्टिकोनातून सरकारकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.