लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून रानटी हत्तींचा धुडगूस सुरू आहे. हत्तींना आवरा अन्यथा शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तुटपुंज्या मदतीत वाढ करा, अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली.
यासंदर्भात दि. १० एप्रिल रोजी माध्यमांशी बोलताना ब्राह्मणवाडे म्हणाले, गेल्यावर्षी वनमंत्र्यांच्या घरावर घंटानाद आंदोलन केले होते, तसेच गडचिरोली ते नागपूरपर्यत पायी मोर्चा सुद्धा काढून जिल्ह्यातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती, तेव्हा त्यांनी आश्वासन दिले होते, पण अद्याप उपाययोजना झालेल्या नाहीत. सध्या आरमोरी व गडचिरोली तालुक्यात रानटी हत्तींचा कळप हाताशी आलेल्या धान, मका व इतर पिकांचे नुकसान करत आहे, यानंतर शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळते. त्यामुळे हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा व धानउत्पादकांना एकरी एक लाख व मका उत्पादकांना एकरी दोन लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.
हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोलीजवळ
- महिनाभरापासून हत्तींचा कळप आरमोरी तालुक्यातील देऊळगाव परिसरात होता. महिनाभराच्या कालावधीत उन्हाळी धान व मका पिकाचे मोठे नुकसान या हत्तींनी केले. त्यानंतर पुन्हा हा कळप गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा परिसरात गुरूवारी रात्री ८ वाजता दाखल झाला आहे.
- हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. काय करावे, असा प्रश्न आहे. लाखो रुपयांचे नुकसान केल्यानंतर त्याची भरपाई म्हणून वनविभाग हजार रुपयांत देते. वनविभागाकडून दिली जाणारी भरपाई खर्चही भरून काढत नाही.