लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाची पहिलीच निवडणूक प्रशासकीय गोंधळामुळे चांगलीच चर्चेत राहिली. मतदानापासून तर मतमोजणीपर्यंत अनेक बाबतीत नियोजनाचा अभाव दिसून आला. प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर अनेक वर्षांपासून विद्यापीठाचा कारभार सुरू आहे. त्यातून प्रशासकीय कामात सुसूत्रतेचा अभाव प्रकर्षाने दिसून आला.२०११ मध्ये स्थापित झालेल्या गोंडवाना विद्यापीठात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश होतो. आतापर्यंत शासननियुक्त समित्यांच्या भरोशावर कारभार सुरू होता. आता पहिल्यांदाच सिनेट, विद्वत परिषद आणि अभ्यास मंडळांच्या निवडणुकांसाठी दि.१० डिसेंबरला मतदान पार पडले. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी येथील मतदान केंद्रांवर चार मतपत्रिकेऐवजी केंद्राधिकाऱ्याने एकच मतपत्रिका दिली. त्यामुळे मतदार पसंतक्रमाने सर्व उमेदवारांना मतदान करण्याऐवजी एकाच उमेदवाराला मतदान करून निघून गेले. आष्टी केंद्रावर निळ्याऐवजी काळ्या शाईचा उपयोग केला गेला. याशिवाय एका केंद्रावर नियमबाह्यपणे मार्कर पेनचा उपयोग झाल्याचे बुधवार दि.१३ ला मतमोजणीदरम्यान लक्षात आले. यामुळे काही केंद्रांवर फेरमतदान करण्याची मागणी करण्यात आली. यातूनच मतमोजणी प्रक्रिया रात्री एक तास ठप्प झाली होती. पोलिसांनाही पाचारण करावे लागले. दरम्यान कुलगुरू एन.व्ही.कल्याणकर यांनी कोणताही गोंधळ किंवा गैरप्रकार झाला नसल्याचे सांगत आक्षेप नोंदविणाºयांना कुलपतींकडे दाद मागा, असे सांगितले. त्यामुळे याप्रकरणी काही जणांनी कुलपतींसह न्यायालयात याचिका मागण्याची तयारी सुरू केली आहे.मतदानाच्या दिवशी एका मतदाराला किती वेळ लागणार, त्यादृष्टीने कुठे किती मतदान केंद्र ठेवावे लागतील याचा अंदाज विद्यापीठ प्रशासनाला आला नाही. परिणामी सर्वाधिक मतदार असणाऱ्या गडचिरोलीत रात्री ९ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहूनही ४० टक्के मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. याच नियोजनशून्यतेमुळे मतमोजणीसाठीही तब्बल २० तासांचा अवधी लागून उमेदवारांना रात्रभर ताटकळत राहावे लागले.विशेष म्हणजे एवढ्या सर्व प्रक्रियेनंतर तातडीने निकाल जाहीर करण्याचे सौजन्य दाखविण्याऐवजी मतमोजणीच्या तिसºया दिवशी (शुक्रवारी) निकाल जाहीर करू असे सांगून कुलगुरूंनी कळस केला. शेवटी प्रसार माध्यमांच्या दबावामुळे गुरूवारी सायंकाळी प्रभारी कुलसचिवांनी निकालाची प्रत उपलब्ध करून दिली.कुलसचिवांपासून अनेक महत्वाची पदे रिक्त असल्यामुळे विद्यापीठाच्या कारभारावर परिणाम होत आहे.
गोंधळाने गाजली सिनेटची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:11 AM