तहसील कार्यालयावर धडक : पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणीकुरखेडा : ११ व १२ सप्टेंबर रोजी कुरखेडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सती नदीला पूर आला. तसेच छोटे नाले व तलाव तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाले. परिणामी शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीमुळे कुरखेडा तालुक्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत. नुकसानग्रस्त व पूर पीडित शेतकरी व नागरिकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुरखेडाच्या तहसील कार्यालयावर सोमवारी धडक दिली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट व काँग्रेसचे कुरखेडा तालुकाध्यक्ष जयंत हरडे यांच्या नेतृत्त्वात शेतकरी, शेतमजुरांसह शेकडो नुकसानग्रस्त नागरिक सोमवारी तहसील कार्यालयात पोहोचले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.दरम्यान जीवन नाट, जयंत हरडे यांनी नुकसानग्रस्त शेत, पडझड झालेल्या घरांचे तत्काळ पंचनामे करण्याची कार्यवाहीबाबत चर्चा केली. निवेदनात म्हटले आहे की, सती नदीकाठावरील तसेच खोलगट भागात असलेल्या शेत जमिनीतील धान पीक, मिरची रोपे खरडून पुराच्या पाण्याने वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे अनेक घरांची अंशत: पडझड झाली. त्यामुळे संबंधित कुटुंबियांसमोर निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच दुष्काळाच्या व्युहचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने आघात केला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महसूल कर्मचाऱ्यांनी तत्काळ मोका पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठवावे तसेच शासनाकडून मदत मिळण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना धनिराम परसो, पंचायत समिती सदस्य प्रभाकर तुलावी, सिराजखॉ पठाण, कुरखेडा नगर पंचायतीचे नगरसेवक मनोज सिडाम, इसमान खॉ पठाण, रोहित ढवळे, माधव दहीकर, तुकाराम मारगाये तसेच शेतकरी बुधराम मडावी, हरिश्चंद्र तुलावी, दिगांबर तुलावी, यशवंत उईके, भाष्कर तुलावी, हेमराज तुलावी, सुखदेव हलामी, गणेश हलामी आदींसह बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पूर पीडितांसाठी काँग्रेसजन सरसावले
By admin | Published: September 14, 2016 1:50 AM