शहरातील इंदिरा गांधी चौकात सकाळी ७.३० वाजता निघालेल्या रॅलीची जिल्हा क्रीडा संकुल येथे सांगता झाली. सायकल रॅलीला आंतरराष्ट्रीय शिकाई मार्शल आर्ट खेळाडू एंजल देवकुले हिने हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी इंदिरा गांधी चौकात खेळाडूंबाबत संदेश देणारा सेल्फी पॉइंटही ठेवला होता. कार्यक्रमाला न. प. मुख्याधिकारी संजीव ओहोळ, शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाचे संशोधन सहायक गजानन बादलमवार, अहेरीच्या तालुका क्रीडा अधिकारी जयलक्ष्मी सारीकोंडा, क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, घनश्याम वरारकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय खोकले, विशाल लोणारे, खुशाल मस्के, संदीप पेदापल्ली, महेंद्र रामटेके, प्रवीण बारसागडे, चंद्रगुप्त कुनघाडकर, कुणाल मानकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा संघटक नितेश झाडे यांनी केले.
(बॉक्स)
आतापासून तयारी करा, यश मिळेल
यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी उपस्थित खेळाडू आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, गडचिरोलीमधील युवकांनाही क्रीडा प्रकारात खूप मोठी संधी आहे. कोणत्याही स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी आज आणि आतापासूनची वेळ महत्त्वाची असते. तुम्ही कोणत्याही खेळामध्ये नैपुण्य प्राप्त करण्यासाठी आजपासून प्रयत्न सुरू केले तर येत्या तीन ते चार वर्षांत गडचिरोलीमधून चांगले खेळाडू बाहेर पडतील, असा विश्वास व्यक्त केला. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी जीवनातील खेळाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले.