महिला काँग्रेसचा पुढाकार : १० दिवस कार्यकर्त्यांमध्येही राहणार उत्साहगडचिरोली : सार्वजनिक गणेश उत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे सध्या १६० वे जयंती वर्ष सुरू आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या चळवळीला पुढील वर्षी १२५ वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच’ या लोकमान्य टिळकांच्या जगप्रसिद्ध उद्गारचे चालू वर्ष शतक महोत्सवी वर्ष आहे. अशा अद्वितीय मुहूर्तावर यंदा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांच्या पुढाकाराने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे सततच्या पराभवाने मरगळलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी १० दिवस गणरायाच्या आगमनाने चैतन्याचे वातावरण अनुभवास मिळणार आहे.चामोर्शी मार्गावरील गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ५ सप्टेंबरला गणरायाची प्रतिष्ठापना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे यांच्या उपस्थितीत विधीवत करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शहरातील महिला काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच सार्वजनिक गणेश उत्सव कार्यालयात साजरा होत असल्याची माहिती महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. या गणेश उत्सवाच्या निमित्ताने १० दिवस काँग्रेस कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला कार्यकर्त्या यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सकाळी व सायंकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशाच्या गजरात येथे आरती केली जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले असून पक्षातील गटबाजीची पर्वा न करता कार्यकर्ते या गणेश उत्सवात उत्साहाने सहभागी झाले आहे. यंदाचे व पुढचे वर्ष हे निवडणुकीचे असल्याने काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळू दे व शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होऊ दे, असे साकडे कार्यकर्त्यांनी गणराजाला घातले आहे.
काँग्रेस कमिटीत विराजले गणराज
By admin | Published: September 08, 2016 1:34 AM