विजय वडेट्टीवार यांची माहिती : अविश्वास प्रस्तावाशी आपला संबंध नाहीगडचिरोली : जिल्हा परिषदेत अविश्वास दाखल झालेले दोनही पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे नव्हते. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली व या संपूर्ण घटनाक्रमात काँग्रेस पक्ष नेमका कोणत्या बाजुने होता, हे आपल्यालाही अद्याप कळलेले नाही, असे काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिल्हा परिषदेत नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या सभापतीवरील अविश्वास प्रस्तावाशी आपला कोणताही संबंध नाही, काँग्रेस पक्ष विश्वासाच्या बाजुने होता की अविश्वासाच्या बाजुने होता हे आपल्याला माहित नाही. पक्ष नेमका कोणत्या दिशेने जात आहे, याचीही माहिती आपल्याला नसल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना प्रस्ताव बारगळल्यानंतर आपण दोन्ही सभापती पक्षाचे नव्हते, अशी माहिती दिली. ठरावाच्या बाजुने पाच तर विरोधात सात सदस्य होते. माजी आमदार तथा जि. प. सदस्य पेंटाराम तलांडी यांनाही आपण काहीही सांगितले नाही. अतुल गण्यारपवार हे अतिशय खोटे आरोप करीत आहे. ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल झाला, तो माणूस आपल्यावर आरोप करण्याच्या पात्रतेचा नाही, असेही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. आपल्याला अविश्वात प्रस्तावात लक्ष घालायचेच असते तर आपण काँग्रेसचा सभापती बसविण्यासाठी लक्ष घातले असते, असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्ष नेमक्या कोणाच्या बाजुने आहे, हेच आपल्या लक्षात आलेले नाही. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची दिशाभूल करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसने अतुल गण्यारपवारांसोबत आघाडी केली होती. आघाडी धर्मानुसार काँग्रेसला उपसभापती पद देणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. काँग्रेसचे नेतृत्व नेमकी त्यांची बाजू कशासाठी घेत आहे, यात काय सारस्य आहे, असा सवालही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केला.चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत १ कोटी १७ लाख रूपयांचा गैरव्यवहार झालेला आहे. यासंदर्भात आर्थिक अंकेक्षणातही आक्षेप नोंदविण्यात आले आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी आगामी विधी मंडळ अधिवेशनात आपण करणार असल्याची माहिती आ. विजय वडेट्टीवार यांनी दिली.या पत्रकार परिषदेला माजी आमदार तथा जिल्हा परिषद सदस्य पेंटारामा तलांडी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, मुस्ताफ हकीम आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)गण्यारपवारांच्या काँग्रेस प्रवेशाला विरोध करणारअतुल गण्यारपवार यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा काँग्रेस प्रवेश करण्याचा पक्षाच्या काही लोकांकडून प्रयत्न झाल्यास आपण याबाबत विरोध करणार आहो, याची माहिती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष व श्रेष्ठींना दिली जाईल, अशा भ्रष्ट व्यक्तीला पक्षात प्रवेश करू दिला जाणार नाही, असा इशाराही आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिला आहे. अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल, तो अधिकार जिल्ह्यातील नेत्यांना नाही, असेही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी म्हणाले. गण्यारपवार हे सातत्याने काँग्रेस विरोधात काम करीत असतात. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांच्या विरोधात २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या विरोधात लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकात काम केले, असेही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
अविश्वास प्रस्तावावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल
By admin | Published: October 16, 2015 1:49 AM