गडचिरोली : जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात सर्वाधिक ३९ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या. त्याखालोखाल भाजपला ३६ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने २६ जागा पटकावल्या तर, शिवसेनेने १४ जागी विजय मिळविला. या निकालात काँग्रेसने सर्वाधिक जागा पटकावल्या असल्यातरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ३ आणि भाजपने सर्वाधिक १२ जागा गमावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसलाही गेल्यावेळच्या तुलनेत ६ जागा कमी मिळाल्या. दुसरीकडे शिवसेनेच्या २ जागा वाढल्या. स्थानिक संघटना असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघाचे प्राबल्य वाढले असून त्यांच्या उमेदवारांनी तब्बल २० जागी विजय मिळवत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. गेल्यावेळी आदिवासी विद्यार्थी संघाकडे केवळ ४ जागा होत्या. ४ वरून २० अशी मुसंडी त्यांनी मारली.
काँग्रेस पक्षाने काही महिन्यांपूर्वीच संघटनात्मक बदल करत युवा चेहऱ्यांना संधी दिली. ना. विजय वडेट्टीवार यांनीही शक्य तितका वेळ देत काँग्रेसची बाजू सावरली; अन्यथा काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता होती. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी स्पष्ट बहुमत केवळ धानोरा या एकाच ठिकाणी मिळाले. सिरोंचा नगर पंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघ, कुरखेडा येथे काँग्रेस तर मुलचेरा नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भामरागड, अहेरी, एटापल्ली, चामाेर्शी, काेरची नगर पंचायतीत स्पष्ट बहुमत कुणालाच मिळाले नाही. त्यामुळे तळ्यात-मळ्यात अशी स्थिती असून तेथे सत्ता स्थापन करण्यासाठी जाेरदार घमासान हाेण्याची चिन्हे आहेत.