Gadchiroli | हत्ती कॅम्प वाचवण्यासाठी काँग्रेसचे वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
By मनोज ताजने | Published: September 8, 2022 06:23 PM2022-09-08T18:23:50+5:302022-09-08T18:27:59+5:30
Gadchiroli Elephant Camp : उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला चपराक देत हत्तींच्या स्थलांतरावरून ताशेरे ओढले आहे.
गडचिरोली : पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमधील ८ पैकी ४ हत्ती गुजरात राज्यातील एका खाजगी प्राणी संग्रहालयात नेण्याच्या निर्णयावर जाब विचारण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (दि.८) येथील वनसंरक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे वनअधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या पूर्वीही हत्ती नेण्याच्या हालचाली सुरू होत्या त्यावेळीही काँग्रेसच्या वतीने कमलापूर येथे जाऊन मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्यातील हत्तींच्या स्थलांतराचा विषय प्रलंबित ठेवला होता. मात्र नवीन सरकारने हत्तीच्या स्थलांतराला हिरवा कंदील दिला आणि अर्ध्या रात्री आलापल्लीजवळच्या पातानीलमधील ३ हत्ती चोराप्रमाणेच चोरून घेऊन गेले, असा आरोप यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला.
नागपूर उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला चपराक देत हत्तींच्या स्थलांतरावरून ताशेरे ओढले आहे. तरीही हे सरकार गप्प असल्याने जिल्हा काँग्रेसच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध करीत असल्याचे ब्राम्हणवाडे म्हणाले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ.चंदा कोडवते, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील वन्यजीव व पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते.