बेरोजगारीविरोधात काँग्रेस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:00 AM2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:01:16+5:30
लोकसभा निवडणुकीच्यावेळी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीने दिले होते. प्रत्यक्षात रोजगाराची निर्मिती अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगार युवकांची संख्या वाढत चालली आहे. मात्र केंद्र शासन योग्य ते धोरण राबवून रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत आहे. रोजगार निर्मितीबाबत शासनाकडे कोणतेही ठोस नियोजन नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देशातील वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने रोजगाराची साधने निर्माण करावी या मागणीसाठी युवक काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष कुनाल राऊत यांच्या नेतृत्वात गडचिरोली काँग्रेच्या वतीने निदर्शने देऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधानांना पाठविले आहे.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीने दिले होते. प्रत्यक्षात रोजगाराची निर्मिती अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगार युवकांची संख्या वाढत चालली आहे. मात्र केंद्र शासन योग्य ते धोरण राबवून रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत आहे. रोजगार निर्मितीबाबत शासनाकडे कोणतेही ठोस नियोजन नाही. खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना भारत सरकारच्या विविध खात्यांमध्ये सचिव पदावर नियुक्त केले जात आहे. डिजीटल इंडिया, कौशल्य विकास योजना अपयशी ठरल्या आहेत. केंद्र शासनाच्या विविध खात्यांमध्ये १० लाख जागा रिक्त असताना नोकर भरतीवर बंदी घातली आहे. रस्ते, मंदिरे व पुतळे बनविण्यावर शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. रोजगार वाढीसाठी शासनाने प्रयत्न करावे असे निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अजीत सिंह, सचीव आसीफ शेख , डॉ. प्रणित जांभूले, निलेश खोरगडे, पीयुष वाकोडीकर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नामदेव किरसान, डॉ. चंदा कोडवते, पंकज गुड्डेवार, महेंद्र ब्राम्हणवाडे, सतीश विधाते, पांडुरंग घोटेकर, विश्वजीत कोवासे, गौरव अलाम, गौरव येनप्रेड्डीवार, डॉ.मेघा सावसाकडे, रामेश्वर शेंदरे, नरेंद्र गजपुरे, उमाकांत हारगुळे, अभय नाकाडे, रजनिकांत मोटघरे, अमर नवघडे, इरशाद शेख आदी उपस्थित होते.
कुणाल राऊत यांचे शहरात आगमन झाल्यानंतर गांधी चौकातील रेस्टहाऊस ते काँग्रेस कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.