अपक्षासोबत आघाडी करणार नाही : पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती चामोर्शी : आगामी जि. प. व पं. स. निवडणुकीत तालुका काँग्रेस कोणत्याही अपक्षाशी आघाडी करणार नसून तालुक्यातील या निवडणुका स्वबळावर लढणार याबाबत पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणार असल्याची माहिती तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दिना विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत माहिती देताना पदाधिकारी म्हणाले, भाजप-सेना सरकारने शेतकऱ्यांना खोटे आमिष दाखवत त्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाही. धानाला हमीभाव देण्यात आला नाही. तसेच बेरोजगारांना रोजगार, शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा केली नाही. जुन्याच योजना नवीन नावे देऊन नवीन योजना अंमलात आणल्याचे भासविले जात आहे. मागेल त्याला विहीर या योजनेचा तालुक्यात फज्जा उडत आहे. तर सरकार योजनेच्या प्रसिद्धीवर अतोनात खर्च करीत आहे, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. ९ जानेवारीला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नोटबंदी विरोधात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तालुक्यात काँग्रेसचे उमेदवार तयार असून त्याची घोषणा लवकरच केली जाईल. प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र प्रभारीची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. तालुक्यातील भिवापूर ते आमगाव रस्ता पूर्णत: उखडला असून या मार्गाने आवागमन करणे कठीण आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती करावी, अवैध धंदे बंद करावे, कमी दराने जळाऊ लाकडे उपलब्ध करावी, चामोर्शी-चंद्रपूर बससेवा सुरू करावी, अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली. पत्रकार परिषदेला जिल्हा महासचिव राजेश ठाकूर, सुरेश भांडेकर, तालुकाध्यक्ष निशांत नैताम, सभापती सुमेध तुरे, विजय शातलवार, किरण आकुलवार, नीलकंठ निखाडे, वेणूदास तुरे, नाजूक वाळके, उमेश कुंभरे, भाऊ झुरे, राजू राऊत, पेंटू पेशट्टीवार व पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
काँग्रेस स्वबळावर लढणार
By admin | Published: January 08, 2017 1:39 AM