काँग्रेसचा मोर्चा तहसीलवर धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 01:43 AM2018-10-10T01:43:05+5:302018-10-10T01:43:43+5:30
बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब जनतेच्या विविध मागण्यांसाठी, तसेच वाढत्या महागाईच्या विरोधात सोमवारी येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब जनतेच्या विविध मागण्यांसाठी, तसेच वाढत्या महागाईच्या विरोधात सोमवारी येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी खा. मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृहापासून मोर्चास प्रारंभ झाला.
विजेचे वाढते दर कमी करावे, तसेच रिडिंग न करता देण्यात येणाऱ्या वीज बिलात दुरुस्ती करावी, कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे, पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ थांबवून दर कमी करावे, तालुक्यातील प्रत्येक कुटुंबास दोन लीटर याप्रमाणे केरोसीन देण्यात यावे, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोचार्चे रुपांतर सभेत झाले. यावेळी आ. विजय वडेट्टीवार, डॉ. नामदेव उसेंडी यांनी भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत दोन्ही सरकारांना सत्तेवरुन खाली खेचा, असे आवाहन वडेट्टीवार व उसेंडी यांनी केले.
यावेळी काँग्रेसचे निरीक्षक सुरेश भोयर, डॉ. नितीन कोडवते, जि. प. सदस्य अॅड. राम मेश्राम, हसनअली गिलानी, महेंद्र ब्राम्हणवाडे, सगुणा तलांडी, जि. प. सदस्य रवींद्र शहा, पं. स. सभापती सुवर्णा येमुलवार, एटापल्लीचे तालुकाध्यक्ष संजय चरडुके, जि. प. सदस्य रुपाली पंदिलवार, शंकर हलदर, दादाजी सिडाम, अहेरी तालुकाध्यक्ष मुश्ताक हकीम, यांच्यासह तालुक्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदारांमार्फत मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविण्यात आले.