रुग्णालयातही भेट : मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत लोकमत न्यूज नेटवर्क मुलचेरा : धन्नूर गावात वीज पडून पितापुत्रासह चार जण दगावण्याच्या घटनेने हे गाव हादरून गेले आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी शोकाकुल वातावरणात मृृतदेहांवर अंत्यस्कार करण्यात आले. दरम्यान एसडीओ, तहसीलदार यांच्यासह जि.प.सभापती व सदस्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या शामराव कन्नाके यांच्यासह त्यांचा तरुण मुलगा रितेश आणि जानकीराम तोडसाम हे कोसळलेल्या वीजेमुळे भाजून दगावले. या तिघांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात तर चौथी मृतक संदीप शिवराम कुसनाके यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. शनिवारी सकाळपासून गावातील लोकांनी रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली होती. दुपारी ३ च्या सुमारास उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह गावात आणण्यात आले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती माधुरी संतोष उरेते यांनी धन्नूर येथे शनिवारी भेट देऊन या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून आर्थिक मदत दिली. यावेळी माजी पं. स. सभापती नामदेव कुसनाके, संतोष उरेते, राजू पम्बलवार, दीपक बिस्वास आदी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी नितीन सतगीर व तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, आष्टीचे संजय पंदीलवार यांनीही धन्नूर येथील वीज पडून मृत पावलेल्या व्यक्तींच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. चामोर्शीचे तलाठी रितेश चिंंदमवार यांनी सकाळी ग्रामीण रुग्णालयात जखमींकडून घटनेची माहिती घेतली.
सभापती, एसडीओंनी केले सांत्वन
By admin | Published: June 11, 2017 1:27 AM