उद्दिष्टपूर्ततेची धडपड : जनजागृती रथाच्या माध्यमातून दुर्गम भागातील गावांमध्ये हागणदारीमुक्तीसाठी मोहीम एटापल्ली : एटापल्ली तालुक्याला २०१६-१७ या वर्षात २ हजार ८३० शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सदर उद्दिष्ट ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांनी शौचालय बांधकामाला सुरूवात करून ३१ मार्चपूर्वी शौचालय बांधावे. यासाठी जनजागृती करण्याची मोहीम पंचायत समितीने हाती घेतली आहे. या मोहिमेचा शुभारंभ एटापल्ली पं.स.च्या सभापती बेबी लेकामी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे. या शासकीय अनुदानाचा सदुपयोग करून शौचालयाचे बांधकाम करावे व त्याचा वापर करावा यासाठी एटापल्ली पंचायत समितीच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने जनजागृती रथ तयार करण्यात आले आहे. या रथाला शुक्रवारी पंचायत समितीच्या सभापती बेबी लेकामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी पं.स. सदस्य नल्लावार, गट विकास अधिकारी वाघमारे, नोडल आॅफीसर अमित फंडे, ढवस यांच्यासह ग्रामसेवक कर्मचारी उपस्थित होते. या रथाच्या माध्यमातून तुमरगुंडा, उडेरा, कांदोळी, येमली, तोडसा, नागुलवाडी, घोटसूर व सोहगाव येथे रथ जनजागृती केली जाणार आहे. या रथावर शौचालय बांधकामासाठी देण्यात येणारे १२ हजार रूपये प्रोत्साहन अनुदान आदीवर मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमा यशस्वितेसाठी जे. वाय. उराडे, एस. पी. राऊत, राज कांबळे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
एटापल्ली तालुक्यात २ हजार ८३० शौचालयांचे बांधकाम होणार
By admin | Published: March 18, 2017 2:24 AM