देसाईगंज: नगर परिषद क्षेत्रात घराचे बांधकाम करायचे असेल तर नगर परिषदेकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र शहरातील बहुतांश घरमालक नगर परिषदेकडे परवानगी न घेताच घरांचे बांधकाम करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे नगर परिषदेचे महसूल बुडत आहे. त्याचबरोबर नियमानुसार घराचे बांधकामही होत नसल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. मात्र नगर परिषद प्रशासन त्यांच्यावर कारवाई करीत नाही.
अल्पवयीन चालकाकडे पोलिसांचे दुर्लक्ष
आरमाेरी: शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन वाहनधारकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र याकडे वाहतूक पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांचे वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले आहे.
भामरागडात बायोमेट्रिक मशीन बंद
भामरागड : शासनाने कर्मचाºयांच्या नियमित हजेरीकरिता अनेक कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसविलेल्या आहे. भामरागडातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोडले तर बºयाच कार्यालयात ही बायोमेट्रिक मशीन बंद पडलेली आहे.
परप्रांतीय दारू विक्री विरोधात कारवाईच नाही
गडचिरोली : तेलंगणा, छत्तीसगड राज्यातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू तस्करी केली जात आहे. गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनाने दारूबंदीच्या विरोधात कडक पावले उचलले असले तरी परप्रांतीय दारू पुरवठादारांवर कारवाई करण्यासाठी दोन राज्याच्या पोलिसांमध्ये समन्वयाची गरज आहे.
आठवडी बाजारातील वजन काटे तपासा
गडचिरोली : गडचिरोली येथे रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात लाखो रूपयांची आर्थिक उलाढाल होते. मात्र या बाजारात अनेक विक्रेत्यांकडे असलेल्या वजनकाट्यांमध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून येते. अधिकाºयांनी आठवडी बाजारात वजन काटे तपासणीची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष
काेरची: गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्व वार्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. प्रशासनाचे डुकरांच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. पुन्हा डुकर पकडण्याची मोहीम पालिकेने राबवावी, अशी मागणी होत आहे.
भेंडाळा बसस्थानकावर गतिरोधक उभारा
भेंडाळा: मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूल मार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. बसस्थानकावर प्रवाशी व विद्यार्थ्यांची नेहमीच गर्दी राहते. गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग कमी केला जात नाही. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक उभारावा.
लाहेरी आरोग्य केंद्रात समस्या
भामरागड : तालुक्यातील लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. सदर आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी लाहेरी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव
गडचिरोली : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहित आहे, ते नागरिक फोन करतात. मात्र सदर फोन बंद असल्याचे सांगण्यात येत आहे.
कठड्यांअभावी चामोर्शी मार्गावर अपघाताची शक्यता
चामोर्शी : चामोर्शी-आष्टी मार्गावरील अनेक पुलावर अद्यापही कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता आहे. पुलाच्या बाजुला झुडूपे आहेत. या झूडुपांमुळे नाला व नाल्यावरील पूल दिसत नाही. या पुलाची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे. रात्रीच्या सुमारास पुल दिसून येत नाही. आजपर्यंत अनेक अपघात वाढले आहेत.
मुद्रा योजनेंतर्गत कर्ज पुरवठा वाढवा
वैरागड: केंद्र शासनाने उद्योगांना कर्जाचा पुरवठा करण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली आहे. शेकडो युवकांचे अर्ज बँकेमध्ये पडून आहेत. प्रशासकीय यंत्रणेने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली नाही. दुर्गम भागातील बेरोजगार या योजनेबाबत अनभिज्ञ आहेत. जनजागृतीची गरज आहे.