आरटीओ कार्यालयाची इमारत : आतापर्यंत ४ कोटी १९ लाख रूपये खर्च; तीन महिन्यांत होणार सज्ज दिलीप दहेलकर गडचिरोली स्थानिक गोंडवाना विद्यापीठाकडे जाणाऱ्या कोटगल मार्गावर आरक्षित करण्यात आलेल्या १.७३ हेक्टर आर. जागेमध्ये गडचिरोलीच्या उपप्रादेशिक कार्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत हे काम आता ८० टक्क्यांवर पोहोचले असून या कामावर आतापर्यंत ४ कोटी १९ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. येत्या तीन महिन्यांत अंतर्गत रस्ते, विद्युतीकरणासह येथील सर्व उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार असून आरटीओ कार्यालयासाठी नवी इमारत सज्ज होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या बॅरेकमध्ये गडचिरोलीच्या आरटीओ कार्यालयाचे कामकाज गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र या ठिकाणी पुरेशी जागा नसल्याने येथे नव्या शिकाऊ परवानाधारकांची ट्रायल घेण्यास अडचण निर्माण होते. शिवाय आरटीओ कार्यालयाला अनेक अडचणी येतात. या सर्व अडचणी सोडवून आरटीओ कार्यालयाच्या कामात गती आणण्याच्या उद्देशाने शासनाने फेब्रुवारी २०१४ मध्ये आरटीओ कार्यालयाच्या नव्या इमारतीला मंजुरी प्रदान केली. अंदाजपत्रकानुसार आरटीओ कार्यालय इमारतीच्या कामास ६ कोटी १९ लाख ५८ हजार रूपये खर्चास प्रशासकीय मान्यता शासनाने दिली. त्यानंतर काही दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली खासगी कंत्राटदाराकडून या इमारतीचे काम सुरू करण्यात आले. सद्य:स्थितीत सदर आरक्षित जागेत आरटीओ कार्यालयाची मुख्य इमारत, सायकल, दुचाकी स्टँड, सुलभ शौचालय, संरक्षण भिंत तसेच प्रवेशद्वार आदी कामे पूर्ण झाली आहेत. सदर इमारतीच्या कामासाठी सन २०१४-१५ वर्षात ८५.८१ लाख, २०१५-१६ मध्ये ८६.९६ लाख व सन २०१६-१७ मध्ये २४७.१२ असे एकूण ४ कोटी १९ लाख ८९ हजार रूपये प्राप्त झाले. इमारत बांधकामावर हा सर्व निधी खर्च करण्यात आला. आता सदर इमारतीचे विद्युतीकरण, फर्निचर, फायटनिंग, नागरिकांसाठी सुविधा, सायनेजेस तसेच सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करणे आदी कामे शिल्लक आहेत. सदर कामे लवकरच करण्यात येणार आहे. मात्र शासनाकडून निधी प्राप्त झाल्यावर विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ गडचिरोलीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. आरटीओ कार्यालयाची नवी प्रशस्त इमारत तयार झाल्यानंतर नव्या इमारतीत आरटीओ कार्यालय स्थानांतरित करण्यात येणार आहे. या ठिकाणी संगणकाची अद्यावत व्यवस्था, सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून नागरिकांना विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. नव्या इमारतीत आरटीओ कार्यालयाचा कारभार गेल्यानंतर प्रशासकीय कामकाजातही गती येणार आहे. २ कोटी ३० लाख हवे इमारतीचे विद्युतीकरण व इतर कामे करण्यासाठी आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाला २ कोटी ३० लाख रूपयांच्या निधीची गरज आहे. सदर निधी प्राप्त होण्यासाठी आरटीओ कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासनस्तरावर पत्र व्यवहार व पाठपुरावा सुरू आहे. विशेष म्हणजे ३१ मार्च २०१७ पूर्वी शासनाकडून १ कोटीचा निधी प्राप्त झाला होता. कंत्राटदाराचे देयक अदा करण्यात सदर निधी खर्च करण्यात आला. कंत्राटदाराचे तीन-चार महिन्यांपासूनचे एक कोटीचे बिल प्रलंबित होते. ३१ मार्चपूर्वी निधी मिळाल्याने बिल अदा करण्यात आले. चामोर्शी मार्गावर होणार ब्रेक टेस्ट ट्रॅक शासनाने गडचिरोलीच्या आरटीओ कार्यालयासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅकच्या कामास मंजुरी प्रदान केली आहे. याअंतर्गत ६३ लाख २२ हजार रूपये खर्चास मंजुरी दिली आहे. सदर ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी चामोर्शी मार्गावरील गोंडवाना सैनिकी शाळेजवळ ३.४० हेक्टर आर जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. या ठिकाणी ब्रेक टेस्ट ट्रॅक होणार आहे. सदर जागा आरटीओ विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने हस्तांतरित झाली आहे. सदर कामासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर या कामास प्रारंभ करण्यात येणार आहे.
बांधकाम ८० टक्क्यांवर पोहोचले
By admin | Published: April 23, 2017 1:24 AM