सिंचन क्षेत्र वाढले : दवाखान्यांना मिळाल्या नव्या इमारतीगडचिरोली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. मागील पाच वर्षांच्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामांना चालना देण्यात आली. यात कृषी गोदामाची झालेली निर्मिती हे सर्वात भरीव काम म्हणावे लागेल. याशिवाय ग्रामीण भागात अनेक रस्ते दुरूस्ती, रस्त्यांची निर्मिती, सिंचन सुविधा वाढविण्यासाठी तलाव खोलीकरण, बऱ्याच गावातील रखडलेल्या पाणी योजनांना मंजुरी, आरोग्य केंद्रांच्या इमारतींची निर्मिती ही ठळक कामे मागील पाच वर्षांच्या काळात गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी केली. २०१२ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर भाग्यश्री आत्राम यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदावर वर्णी लागली व उपाध्यक्षपदी भाजपचे डॉ. तामदेव दुधबळे विराजमान झाले. यावेळी पालकमंत्री पदाची धुरा आर. आर. पाटील यांच्याकडे होती. २०१० मध्ये त्यांनी पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळली. तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला गती देण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात कृषी गोदाम उभारणीच्या कामाला त्यांनी गती दिली. या कामासाठी तत्कालीन सभापती अतुल गण्यारपवार यांनीही सहकार्य केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने आर. आर. पाटील यांनी या कामाला निधी कमी पडू दिला नाही. पोर्ला आरोग्य केंद्राचे उद्घाटनही आर. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सुरू झालेल्या कृषी गोदाम योजनेतून अजूनही गोदामांचे बांधकाम होऊन त्याचे लोकार्पण करण्याचे काम सुरूच आहे. जिल्ह्यात वनकायद्यामुळे रखडलेले सिंचन प्रकल्प. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. ही बाब लक्षात घेऊन मामा तलाव पुनर्जीवित करण्याचे काम त्यावेळी आर. आर. पाटील यांनी हाती घेतले. गडचिरोली जिल्हा परिषदेने याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर नव्या सरकारचे वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या कार्यक्रमाला गती दिली. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दवाखान्यांच्या दुरूस्त्या, नव्या आरोग्य केंद्रांचे बांधकाम, जैवविविधता व्यवस्थापन आदी कामे मागील पाच वर्षांत पार पाडण्यात आले. ज्या गावात पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा नाही, अशा गावात पाणीपुरवठा योजनाही मंजूर करण्यात आल्या. जवळजवळ १० ते १५ गावांना नव्या योजना मिळाल्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कलवट बांधकाम, रस्ते दुरूस्ती, रस्ते निर्मिती आदी कामेही विविध योजनातून करण्यात आले. एकूणच जिल्हा परिषदेच्या मागील पाच वर्षांच्या काळात दखलपात्र काम राहिले ते कृषी गोदाम निर्मितीचेच. याशिवाय कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माध्यमातून पहिल्या अडीच वर्षात शेतीच्या यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला. यंत्राद्वारे धानाची रोवणी, मळणी आदी कामे यामुळे आता जिल्ह्यात होऊ लागले आहे. तत्कालीन कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर यांनी या कामात मोठे परिश्रम घेतले. भामरागडपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्याचे काम त्यांनी व तत्कालीन सभापतींनी केले.याशिवाय जनावरांना उत्कृष्ट प्रतीचे वैरण निर्माण करण्याचेही ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालन व्यवसायालाही चांगले दिवस आल्याचे चित्र दिसून आले.
ग्रामीण गोदामांच्या निर्मितीने जि. प. च्या कामाला उजाळा
By admin | Published: January 14, 2017 12:55 AM