आमदारांनी केली पाहणी : कामाच्या स्थितीचा आढावा घेतला वैरागड : येथून जवळच असलेल्या वैलोचना नदीपात्रातील कमी उंचीच्या पुलामुळे मागील २०-२५ वर्षांपासून थोड्याशा पावसाने देखील पुलावरून पाणी वाहत असायचे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत होती. सदर वाहतुकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी वैलोचना नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले. सदर बांधकाम आता प्रगतीपथावर आहे. कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष आ. क्रिष्णा गजबे यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. बांधकामाचा संपूर्ण आढावा त्यांनी घेतला. वैलोचना नदीवर कमी उंचीचा पूल असल्याने नदीपलिकडील गावांना तसेच वैरागड येथील शेतकऱ्यांना ऐन खरीपाच्या हंगामात प्रचंड अडचणी येत होती. पूरपरिस्थितीमुळे बहुतांशवेळा कामे ठप्प होत होती. आ. क्रिष्णा गजबे यांच्या पाठपुराव्यामुळे वैलोचना नदीवर नवीन पूल बांधकामास मंजुरी मिळाली. सदर पुलाचे बांधकाम प्रशांत कंट्रक्शन कंपनी गडचिरोली मार्फत सुरू असून या पुलाचे काम डिसेंबर २०१६ पासून हाती घेण्यात आले आहे. अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत या पुलाचे काम प्रगतीपथावर पोहोचले आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी वाहतूक सुरू करण्यासाठी सदर पुलाचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कंत्राटदार मनीष समर्थ यांनी आ. क्रिष्णा गजबे यांना दिले. आगामी पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे वाहतूक विस्कळीत होण्याचा प्रश्न उद्भवू नये, यादृष्टीने पूल बांधकामास गती द्यावी, अशा सूचना आ. गजबे यांनी कंत्राटदारांना दिल्या. या प्रसंगी जि. प. सदस्य संपत आळे, भाग्यवान टेकाम उपस्थित होते. (वार्ताहर) जुन्या पुलाचे निर्लेखन होणार वैलोचना नदीवरील सुरू असलेल्या मोठ्या पुलाचे काम पृूर्णत्वास आल्यानंतर या ठिकाणी असलेल्या जुन्या पुलाचे निर्लेखन करण्यात येईल. जुना पूल नष्ट करून येथील कच्चे साहित्य योग्य ठिकाणी कामात लावण्यात येईल, अशी माहिती कंत्राटदार समर्थ यांनी आ. क्रिष्णा गजबे यांना दिली.
वैलोचनाच्या पुलाचे काम प्रगतीपथावर
By admin | Published: April 19, 2017 2:16 AM