वडधम येथील घटना : १७ लाखांचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : तालुक्यातील पेंटीपाका मंडळ कार्यालयांतर्गत येत असलेल्या वडधम गावातील चार घरांना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत चारही घरे जळून खाक झाले असून यामध्ये १७ लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार दिसून येत आहे. या आगीत पोचम जक्कुलू गग्गुरी, लक्ष्मण पोचम गग्गुरी, मांतय्या व्यंकटी नागुला, किष्टय्या जक्कुलु गग्गुरी यांची जळून खाक झाली आहेत. शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास एका घराला आग लागली. आग लागल्याचे माहित होताच घरातील सर्व जण बाहेर पडले. आरडाओरड सुरू केल्यानंतर गावातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली. मात्र आग आटोक्यात न येता घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या. आगीमुळे घरातील सिलिंडरचाही स्फोट झाला. आगीत लक्ष्मण पोचम गग्गुरी (२५) यांच्या कुटुंबात तीन व्यक्ती आहेत. यांच्या घरातील कपडे, धान्य, सोना, चांदी, टीव्ही, कुलर, आलमारी नगदी ५० हजार रूपये असा एकूण ७ लाख ४९ हजार रूपयांचा ऐवज जळाला. पोचम जक्कुलु गग्गुरी (६५) यांच्या कुटुंबातही तीन व्यक्ती आहेत. त्यांच्या घरातील ५ लाख ८७ हजार रूपयांचे सामान जळून खाक झाले. मानस व्यंकटी नागुला (३०) यांच्या कुटुंबात तीन व्यक्ती आहेत. त्यांच्या घराचे १ लाख ४७ हजार रूपयांचे नुकसान झाले. किष्टय्या जक्कुलु गग्गुरी (५३) यांच्या कुटुंबात सहा व्यक्ती आहेत. त्यांच्या घरासह १२ लाख १८ हजार ५०० रूपयांचे सामान जळून खाक झाले आहे. घरांना आग लागल्याची माहिती कळाल्यानंतर सिरोंचाचे नायब तहसीलदार सत्यनारायण कर्डालावार, आरडाचे उपसरपंच रंग्गु बापू, वडधमचे उपसरपंच आकुला मलिकार्जुन यांनी भेट देऊन पाहणी केली. मदत देण्याची मागणी आगग्रस्तांनी केली आहे. अग्नीशमन यंत्रणा द्या सिरोंचा तालुका गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेला तालुका आहे. या तालुक्यांमध्ये सुमारे १४४ गावे आहेत. मात्र या गावांमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी अग्नीशमन यंत्रणा नाही. २२० किमी अंतरावर असलेल्या गडचिरोली येथून अग्नीशमन यंत्रणा बोलविणे कधीच शक्य नाही. दैनिक लोकमतने १७ मे रोजी ‘आग प्रतिबंधक उपाययोजना वाऱ्यावर’ अशा प्रकारचे वृत्त प्रकाशित करून या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सिरोंचा येथे अग्नीशमन यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
चार घरे भस्म
By admin | Published: May 20, 2017 1:34 AM