गेल्या जवळपास दीड महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरात हे प्रमाण आणखीच वाढले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीपासूनच कोरोना पसरत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे संपर्कातील व्यक्तींना शोधून आणि त्यांच्याशी संपर्क करून त्यांना वेळीच विलगीकरणात ठेवले आणि त्यांची कोरोना चाचणी केल्यास कोरोनाची संसर्ग साखळी तोडणे शक्य होणार आहे. आतापर्यंत त्याकडे विशेष लक्ष दिले जात नव्हते; पण आता जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेण्यावर भर दिला जाणार आहे.
दररोज हजार चाचण्या, ५० वर पॉझिटिव्ह
- जिल्ह्यात दररोज एक हजारच्या घरात कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यात ८० टक्के चाचण्या रॅपिड अँटिजन, तर २० टक्केच आरटीपीसीआर चाचण्या आहेत. त्यातून दररोज ५० ते ६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. बुधवारी तर हा आकडा ७२ वर गेला. आजच्या स्थितीत जिल्ह्यात ४६२ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.
- सध्या ॲक्टिव्ह असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण गडचिरोली शहर व परिसरातील असले तरी आता गर्दीचे ठिकाण असणाऱ्या देसाईगंज शहरातही कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वेळीच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांच्या चाचण्या घेतल्यास संसर्ग साखळी तोडणे शक्य होईल.
अनेक ठिकाणी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाहीच
आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी अनेक रुग्णांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबत आरोग्य विभागाने फारशी विचारपूस केलीच नसल्याचा अनुभव सांगितला. अनेकांच्या संपर्कातील व्यक्तींना आरोग्य विभागाकडूनच कोणतीच विचारणा झाली नाही. या दुर्लक्षितपणामुळेच कोरोना वाढत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी प्रशासनाला मदत आणि सहकार्य करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात दैनंदिन स्वरूपात कोरोनाबाधित वाढत आहेत. हे प्रमाण रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील लोकांनी आपणहून तपासणीसाठी सहकार्य करावे. तसेच आरोग्य विभागाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
- दीपक सिंगला, जिल्हाधिकारी